अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या महिलेची प्रकृती खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 19:28 IST2021-06-22T19:27:55+5:302021-06-22T19:28:16+5:30
रुईधारूर येथील उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने महिलेची प्रकृती बिघडली असून तिला अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल केले आहे

अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या महिलेची प्रकृती खालावली
किल्लेधारूर ( बीड ) : रुईधारूर येथील समाजमंदिरासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उपोषणास करणाऱ्या महिलांपैकी एका महिलेची प्रकृती खालावली आहे. उपोषणकर्त्या महिलेस उपचारासाठी अंबाजोगाई येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने उपोषणाची दखल न घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सोमवारपासून रूई धारूर येथील ग्रामस्थ समाजमंदिरासमोरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. ग्रामपंचायत समोर महिला तर पंचायत समितीसमोर पुरुष उपोषण करत आहेत. आज उपोषण करणाऱ्या तीस ते पस्तीस महिलांपैक्की ४५ वर्षीय ललिता देविदास गायकवाड यांची प्रकृती अचानक खालवली. प्रथम त्यांच्यावर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी अंबाजोगाई येथे रवाना करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून दखल नाही
याप्रकरणात प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप आहे. आंदोलकांच्या जीवितास बरेवाईट झाल्यास त्यास जिल्हा प्रशासन, सरपंच व ग्रामसेवक हे जबाबदार राहतील असा इशारा वंचित विकास आघाडीचे शहराध्यक्ष आकाश गायसमूद्रे यांनी दिला आहे.