Health team from Ambajogai departs for Sangli to help flood victims | पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईतून आरोग्य पथक सांगलीकडे रवाना

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अंबाजोगाईतून आरोग्य पथक सांगलीकडे रवाना

अंबाजोगाई (बीड ) : महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी व पूरग्रस्तांना आरोग्यसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ३० डॉक्टरांचे पथक शुक्रवारी सकाळी औषधांचा मोठा साठा व वैद्यकीय उपकरणे घेऊन सांगलीकडे रवाना झाले आहे.  

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर व त्या परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाच्या तडाख्याने  पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. यातून उद्भवलेल्या परिस्थितीने पूरग्रस्तांना वैद्यकीय उपचाराची तत्काळ आवश्यक्त असते. यासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व विभागातील २३ डॉक्टर्स, पाच परिचारिका व दोन वाहनचालक अशा तीस जणांचे पथक निर्माण केले. आवश्यक औषधांचा साठा, ईजीसी मशीन्स व अत्यावश्यक उपकरणे घेऊन हे पथक शुक्रवारी सकाळी सांगलीकडे रवाना झाले. 

पथकात यांचा समावेश 
पथकात डॉ. निखिल काळे, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. प्रभाकर बिचकाटे, डॉ. संकेत वैद्य, डॉ. सागर मावळे, डॉ. तौहराम शकील, डॉ. किशोर मुखमले, डॉ. कौशिक अन्सारी, डॉ. दत्तात्रय नागरखेडे, डॉ. अशफाक सय्यद, डॉ. मोहित विश्वकर्मा, डॉ. शरद शेळके, डॉ. विजयकुमार पवार, डॉ. जे. कृष्णन, डॉ. राहुल बागल, डॉ. पवन राठोड, डॉ. अविनाश मुंडे, डॉ. सागर माने,  डॉ. आकाश वराडे, डॉ. पुष्पदंत रुग्णे, चित्रलेखा बांगर, आशा सोनवणे, पूर्वा दहिफळे, आशा यादव, सय्यद नजिर, या परिचारिकांसह दोन वाहनचालकांचा समावेश आहे. पथकाला अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक राकेश जाधव, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. विनोद वेदपाठक, डॉ. नागेश अब्दगिरे, डॉ. सचिन चौधरी, डॉ. योगेश गालफाडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. 

आवश्यकतेनुसार मदत करू 
पथक किमान एक आठवडाभर रुग्णसेवा करणार आहे. आगामी काळात गरज भासल्यास दुसरे पथकही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना करण्यात येईल. आपत्तीत सापडलेल्या आपल्या बांधवांना आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी उत्स्फुर्तपणे जाण्याची दर्शविलेली तयारी हे रुग्णालय प्रशासनासाठी अभिमानाची बाब आहे. 
- डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता

Web Title: Health team from Ambajogai departs for Sangli to help flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.