जंतनाशक गोळ्या वाटपासाठी आरोग्य विभाग जातोय घरोघरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST2021-03-04T05:04:07+5:302021-03-04T05:04:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यावाटप मोहिमेला १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. परंतू यावेळीही कोरोनाने अडसर घातला ...

जंतनाशक गोळ्या वाटपासाठी आरोग्य विभाग जातोय घरोघरी
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात जंतनाशक गोळ्यावाटप मोहिमेला १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. परंतू यावेळीही कोरोनाने अडसर घातला असला तरी आरोग्य विभागाने घरोघरी जावून जंतनाशक गोळ्या वाटप करण्यास सुरूवात केली आहे. ही माेहीम आठवडाभर चालणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
१ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. ही मोहीम आठवडाभर चालते. सहा महिन्यांपूर्वी कोरोना रूग्णसंख्या जास्त असल्याने या मोहिमेला अडथळा निर्माण झाला होता. यावेळीही तशीच परिस्थिती होती, परंतू आरोग्य विभागाने योग्य नियोजन करून घरोघरी गोळ्या वाटपास सुरूवात केली आहे. काही ठिकाणी लहान मुलांना अंगणवाडीत बोलावले जात असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.
तोंडाला मास्क अन् हातात सॅनिटायझर
गोळ्यावाटप घरोघरी जाऊन केले जात आहे. परंतू हे करताना आपल्यापासून लाभार्थी मुले व त्यांच्या कुटूंबियांना कोरोनाचा धोका पोहचू नये, यासाठी कर्मचारी, आशा या तोंडाला मास्क आणि हातात सॅनिटायझर घेऊनच जात असल्याचे सांगण्यात आले.
३ हजार कर्मचाऱ्यांची फौज
जिल्ह्यता आशा, अंगणवाडी सेविका यांच्यासह कर्मचारी, एएनएम यांच्यामार्फत ही माेहिम यशस्वी केली जात आहे. यासाठी जिल्हाभरात किमान तीन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज यात सहभागी आहे. जिल्हास्तरावरून याचा नियमित आढावाही घेतला जात आहे.
घरोघरी जावून गोळ्या वाटप, यंत्रणा सक्षम
कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जावून गोळ्या वाटप केल्या जात आहेत. यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळले जात आहेत. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची यंत्रणा सक्षम आहे. ८ मार्चला याचा सर्व अहवाल प्राप्त होईल.
- डॉ.संजय कदम, माता व बाल संगोपन अधिकारी बीड