ऊसतोडणी मजुरांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:28 IST2021-01-09T04:28:35+5:302021-01-09T04:28:35+5:30
माजलगाव : दिवसरात्र कष्ट करणाऱ्या ऊसतोडणी मजूर व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या दृष्टीने लोकनेते सुंदरराव ...

ऊसतोडणी मजुरांची आरोग्य तपासणी
माजलगाव : दिवसरात्र कष्ट करणाऱ्या ऊसतोडणी मजूर व त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याबाबत काळजी घेण्याच्या दृष्टीने लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना व जि. प. आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने तेलगाव येथील कारखाना परिसरात आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
कारखाना परिसरातील माता वैष्णवी देवी मंदिरात शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून हे शिबीर पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळंके होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. आर.बी.पवार, एम.डी.घोरपडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन शेकडे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. मारोती लगड,डाॅ. उषा बांगर,शेतकी अधिकारी खरात आदींसह कारखान्याचे इतर अधिकारी उपस्थित होते.
ऊसतोडणी मजूर हे उसाच्या फडात शेतात वास्तव्यास असतात. तेथे ऊसतोडीचे काम करताना त्यांना लहान-मोठे आजार झाले तर ते त्याकडे दुर्लक्ष करत आपले काम करीत असतात. मात्र, कालांतराने हा छोटा आजार मोठा होऊन, त्याचा त्रास सहन करावा लागतो. अशा घटना भविष्यात होऊ नयेत यासाठी या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याचे चेअरमन सोळंके म्हणाले. आरोग्य विभागाने यापुढे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ऊस तोडणी मजुरांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन डाॅ. मारोती लगड यांनी केले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह ऊस तोडणी मजूर, मुकादम आदी उपस्थित होते.
२५० कुटुंबांची तपासणी
या शिबिरात रक्त तपासणी, कुष्ठरोग, तपासणी व उपचार, गरोदर माता तपासणी, बालरोग तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच लसीकरणही करण्यात आले. या शिबिरात जवळपास अडीचशे ऊसतोडणी मजूर कुटुंबाची तपासणी करण्यात आली.