ते तासभर रक्ताच्या थारोळ्यात तडफडले, पण कोणीच वाहनात घेतले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:43+5:302021-03-08T04:31:43+5:30
बीड : भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली आणि ते रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ ...

ते तासभर रक्ताच्या थारोळ्यात तडफडले, पण कोणीच वाहनात घेतले नाही
बीड : भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली आणि ते रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होते. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ मदतीची गरज होती; परंतु उपस्थित लोकांनी केवळ फोटो काढले. महामार्गावरील एकाही वाहनाने त्यांना घेतले नाही. प्रशासनाला संपर्क केल्यानंतरही नेहमीप्रमाणेच रुग्णवाहिका आणि पोलीस उशिराने दाखल झाले. घोडका राजुरीजवळील अपघातस्थळी माणुसकी संपल्याचे दिसत होते.
वडवणीहून बीडला येणाऱ्या रिक्षाला बीडहून जाणाऱ्या मालवाहू ट्रकने जोराची धडक दिली. तसेच पुढे एका दुचाकीलाही धडक देऊन ट्रक तलावात उलटला. या भीषण अपघातात पाच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. सात ते आठ लोक किरकोळ जखमी आहेत. बीड-परळी मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली. जखमी लोक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांना तत्काळ वाहनातून रुग्णालयात आणण्याची गरज होती; परंतु कोणीच पुढे येत नव्हते. कोणी फोटो काढत होते, तर कोणी फुकटचे सल्ले देत होते. काही लोकांनी खासगी वाहनांना विनंती करून जखमींना बीडला नेण्याची विनंती केली; परंतु कोणीच त्यांना वाहनात घेतले नाही. अखेर काही सुजान नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला संपर्क केला. त्यानंतर जवळपास ५० मिनिटांपेक्षा जास्त वेळाने रुग्णवाहिका आली. सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णवाहिका गेल्यावर नेहमीप्रमाणेच पोलीस उशिरा आले. त्यापाठोपाठ वाहतूक शाखा पोलीसही दाखल झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जिल्हा रुग्णालयात गर्दी
अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले. येथील अपघात विभागात जखमींवर उपचार करण्यात आले. दोघांच्या डोक्याला गंभीर मार असल्याने त्यांना औरंगाबादला रेफर केले. अपघाताची माहिती समजल्यानंतर रुग्णालयातही मोठी गर्दी जमली होती. या गर्दीपुढे उपचार करताना आरोग्य पथकाला अनेक अडचणी आल्या. सुरक्षा रक्षक येथेही हजर नसल्याचे सांगण्यात आले.