खुर्चीवर बसवून घोडचूक केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:27 IST2021-01-04T04:27:37+5:302021-01-04T04:27:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शेख मंजुर यांना बसवून घोडचूक केली, असे वक्तव्य आमदार प्रकाश ...

He made a mistake by sitting on a chair | खुर्चीवर बसवून घोडचूक केली

खुर्चीवर बसवून घोडचूक केली

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शेख मंजुर यांना बसवून घोडचूक केली, असे वक्तव्य आमदार प्रकाश सोळंके यांनी रविवारी येथील एका हॉटेलच्या उद‌्घाटनप्रसंगी केल्यानंतर शहरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यावर नगराध्यक्षांनी मात्र मौन राखले आहे.

चार वर्षांपूर्वी येथील नगरपालिकेची निवडणूक होऊन सहाल चाऊस हे नगराध्यक्ष झाले होते. ते नगराध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी घेतलेल्या विविध बैठकींसह, उचललेल्या बिलांबाबत नगरसेवक म्हणून शेख मंजुर यांनी जवळपास ७० ते ८० तक्रारी जिल्हाधिकारी व मंत्रालय स्तरावर केल्या होत्या. यामुळे अनेकवेळा चौकशी होऊन एक वर्षापूर्वी तीन मुख्याधिकारी व चार लेखापालांविरूध्द गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर मार्च महिन्यात नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती.

चाऊस हे तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने त्यांना या पदावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर तीन महिने उपनगराध्यक्षांकडे नगराध्यक्षांचा पदभार होता. नोव्हेंबरमध्ये नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊन नगराध्यक्षपदी चाऊस यांचे कट्टर विरोधक असलेले शेख मंजुर यांना आमदार सोळंके यांनी या पदावर बसवले.

शेख मंजुर यांना नगराध्यक्ष पदावर बसून दोन महिने होत नाहीत तोच त्यांच्याविरोधात त्यांचे नेते व नगरसेवकांमध्येही रोष निर्माण होऊ लागला आहे. याचा प्रत्यय रविवारी सकाळी एका हॉटेलच्या उद‌्घाटनप्रसंगी आला. आमदार प्रकाश सोळंके हे याठिकाणी आले असता, समोर नगराध्यक्ष शेख मंजुर, अच्युतराव लाटे व अन्य काही नगरसेवक बसलेले होते. यावेळी आमदार सोळंके यांनी अच्युतराव लाटे यांच्याकडे बघत व नगराध्यक्षांचे नाव न घेता ‘खुर्चीवर बसवून घोडचूक केली’, असे व्यक्तव्य केल्याने पाच मिनिटे कोणालाच काही कळले नाही. त्यानंतर मात्र नगराध्यक्ष शेख मंजुर यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. यावेळी त्यांना खाली मान घालण्याशिवाय पर्यायच नव्हता. आमदार सोळंके यांच्या या वक्तव्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

आमदार सोळंके यांनी नगराध्यक्ष मंजुर यांना नगरपालिकेत विविध प्रश्नांवर बैठक घेण्यास सांगितले होते. या बैठकीची तारीख व बैठकीचा अजेंडा निघाला असतानाही बैठकीच्या पहिल्या दिवशी नगराध्यक्षांनी बैठक रद्द केली. तसेच त्यांच्या सोईनुसार आठ दिवसांनी बैठक घेतल्याने आमदार सोळंके व नगराध्यक्ष शेख मंजुर यांच्यात ठिणगी पडल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये होत आहे.

Web Title: He made a mistake by sitting on a chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.