बाईच्या वेषात आला अन् मंगळसूत्र हिसकावून पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:51+5:302021-02-05T08:26:51+5:30

- फोटो बीड : चमचमीत साडी.. डोक्यावर लांब केस... असे काहीसे रूप परिधान करून युवक अचानक समोर आला आणि ...

He came in the guise of a woman and snatched the Mangalsutra and ran away | बाईच्या वेषात आला अन् मंगळसूत्र हिसकावून पळाला

बाईच्या वेषात आला अन् मंगळसूत्र हिसकावून पळाला

- फोटो

बीड : चमचमीत साडी.. डोक्यावर लांब केस... असे काहीसे रूप परिधान करून युवक अचानक समोर आला आणि महिला डॉक्टरच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळाला. परंतु, वेळीच डॉक्टरने सतर्कता दाखविल्याने अवघ्या १० मिनिटांत या चोराला पकडण्यात यश आले. ही घटना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दुपारी ४ वाजता घडली. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

मोहिनी जाधव-लांडगे असे या महिला डॉक्टरचे नाव आहे. त्या जिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर आहेत. परंतु, कोरोनामुळे सध्या जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांचा एसएनसीयू विभाग काकू नाना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलेला आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास डॉ. मोहिनी या कर्तव्यावर जात होत्या. दुसऱ्या मजल्यावर एक साडीतील व्यक्ती समोर आली. पैसे मागितले. यांनी दहा रुपये काढून दिले. परंतु, मोहिनी यांनी पर्स उघडताच त्याने सर्वच पैशांवर डल्ला मारला. शिवाय गळ्यातील मंगळसूत्र घेऊन तो वाऱ्याच्या वेगाने खाली पळाला. यावर मोहिनी यांनी त्याला तात्काळ अडविण्यासह आरडाओरड केली. यावर परिसरातील लोकांनी धाव घेत त्याला अवघ्या दहा मिनिटांत पकडले. त्यानंतर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

.... तर चोर पळाला असता

जाधव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्यानंतर त्यांनी घाबरून न जाता त्याला पाय आडवा लावून पकडण्याचा प्रयत्न केला. लगेच आरडाओरड केली. त्यामुळे इतर लोक सतर्क झाले. त्यांनी सतर्कता दाखविली नसती तर तो चोर पसार झाला असता. त्यांच्या धैर्याचे स्वागत होत आहे.

ती हुबेहूब महिला दिसत होती - मोहिनी जाधव

मी ड्युटीवर जात होते. अचानक साडीत आलेला हा तरुण हुबेहूब महिला दिसत होती. मला पैसे मागितले तर मी दिले. परंतु, त्याने पर्स उघडताच सर्व पैसे आणि गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळ काढला. मी लगेच आरडाओरडा केला. दुवा पाहिजे असेल तर आणखी पैसे दे अशी मागणी करीत होता. मी काही बोलण्यपूर्वीच त्याने मंगळसूत्र हिसकावल्याचे डॉ.मोहिनी जाधव यांनी लोकमतला सांगितले.

बीडमध्ये टोळी सक्रिय असण्याची शक्यता

वेशभूषा बदलून चोरी करणे, महिलांच्या अंगावरील दागिने लंपास करण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडले आहेत. आता यात आणखी भर पडली आहे. अशी टोळी शहरात आणि जिल्ह्यात सक्रिय असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिक, महिलांनी सतर्क राहण्याबरोबरच एखाद्यावर संशय येताच तात्काळ जवळच्या पोलिसांना संपर्क करावा, असे आवाहन रवी सानप यांनी केले आहे.

कोट

मंगळसूत्र घेऊन पळणारा चोरटा नागरिकांनी आमच्या स्वाधीन केला आहे. इतर तपासासाठी पथक पाठविले आहे. आरोपीसह मुद्देमाल हाती लागला आहे. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रारदाराला बोलावले आहे.

रवी सानप

पोलीस निरीक्षक, शहर पोलीस ठाणे बीड

Web Title: He came in the guise of a woman and snatched the Mangalsutra and ran away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.