नारायणगड विकासास मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:29 IST2018-02-14T23:28:22+5:302018-02-14T23:29:07+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र नारायणगडास २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन दिल्यामुळे यातून गडाच्या विकासासंदर्भात अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. २०० वर्षे पुरातन असलेल्या या गडाकडे आतापर्यंत सर्वच प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गडाचा विकास खुंटला होता, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.

नारायणगड विकासास मिळाली गती
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र नारायणगडास २५ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करुन दिल्यामुळे यातून गडाच्या विकासासंदर्भात अनेक योजना हाती घेण्यात आल्या आहेत. २०० वर्षे पुरातन असलेल्या या गडाकडे आतापर्यंत सर्वच प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे गडाचा विकास खुंटला होता, असे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
यावेळी गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, राजेंद्र मस्के, प्रभाकर कोलंगडे, अॅड. राहुल मस्के, अनिल घुमरे, सुहास पाटील उपस्थित होते. आ. मेटे म्हणाले की, उद्या १५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री फडणवीस गडावर हेलिकॉप्टरद्वारे येतील. त्यांच्या हस्ते गडावरील विविध विकास कामांचा शुभारंभ होईल. यावेळी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.
गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाखाली विकास कामे होत आहेत. या गडाच्या विकासासाठी ४२ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित होता. पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये मंजूर झाले. याशिवाय गडावर येणाºया रस्त्यांच्या विकासासाठी १५ कोटी रुपयांच्या प्रस्तावासही तत्वत: मान्यता मिळाली आहे. चालू आर्थिक वर्षातच यापैकी काही निधी प्राप्त होईल. गडाची ५०० हेक्टर जमीन आहे. त्यापैकी काही कुळ कायद्यात अडकलेली होती. ही जमीनही महसूल मंत्री पाटील यांच्या सहकार्यातून परत गडाकडे परत आली आहे. पैकी २०० ते ३०० हेक्टरमध्ये आंबा, चिकू, जांभूळ यासारख्या फळझाडांची लागवड केली जाणार असून, या रोपट्यांच्या संवर्धनासाठी ७५ लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. यातून ठिबक सिंचन योजना कार्यान्वित होईल.
हे संस्थान जिल्ह्यासाठी भाविकांचे श्रध्दास्थान आहे. आतापर्यंत तीर्थक्षेत्र म्हणून परिचित असलेल्या या गडास पर्यटनस्थळ म्हणूनही आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडाच्या विकासासाठी भरघोस निधी दिला असून दुसºया टप्प्यातही असाच निधी मिळेल. या निधीतून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचेही आ. विनायक मेटे यांनी सांगितले.
प्रस्तावित अंबाजोगाई जिल्ह्यास पाठिंबा
प्रस्तावित अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून रेंगाळला आहे. आता पुन्हा या प्रश्नाने उचल खाल्ली असून, सर्वपक्षीय समितीही स्थापन झाली आहे. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीच्या प्रस्तावास शिवसंग्रामचा पाठिंबा असून, समितीने दिलेल्या आदेशात शिवसंग्राम सक्रीय सहभाग नोंदवेल. या प्रश्नावर उद्या मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांच्याशी जिल्हा निर्मिती संयोजन समितीच्या पदाधिकाºयांची भेट घडवून आणली जाईल. यासाठी मी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा विकासासाठी भरीव घोषणेची अपेक्षा
बीड जिल्हा हा नेहमीच निसर्गाच्या कोपाखाली आहे. आताही गारपीट झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी उद्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री भरीव घोषणा करतील अशी आशा आहे. तसेच एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या, मुस्लिम समाजाच्या मागण्या यावरही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा घडवून आणली जाईल, असेही आ. विनायक मेटे यांनी सांगितले.