कोरोना चाचणी केंद्रात नागरिकांची वाढती गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:33 IST2021-04-11T04:33:03+5:302021-04-11T04:33:03+5:30
सोशल डिस्टन्सचा अभाव; अँटिजन टेस्ट केलेल्या किट टाकल्या जातात मैदानावरच; आरोग्य विभागातच होतेय नियमांचे उल्लंघन अविनाश ...

कोरोना चाचणी केंद्रात नागरिकांची वाढती गर्दी
सोशल डिस्टन्सचा अभाव; अँटिजन टेस्ट केलेल्या किट टाकल्या जातात मैदानावरच; आरोग्य विभागातच होतेय नियमांचे उल्लंघन
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई - अंबाजोगाई येथील कोरोना चाचणी केंद्रातच कोरोनाच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होऊ लागले आहे. चाचणीसाठी आलेल्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. मात्र, या गर्दीवर नियंत्रण नसल्याने सोशल डिस्टन्सचा मोठा अभाव आहे. अँटिजन टेस्ट केलेल्या किटची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात नाही. त्या किट कार्यालयाच्या समोरील मैदानावरच फेकून दिल्या जातात.
जर आरोग्य विभागातच अशी स्थिती असेल तर इतरांचे काय?
अंबाजोगाई तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग रुग्णांचे संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चाचण्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या चाचण्या प्रामुख्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे होतात. ही इमारत आरोग्य विभागासाठी देण्यात आली आहे. वाढत्या रुग्णांमुळे चाचण्यातही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
एका दिवसांत किमान ३०० आरटीपीसीआर व अँटिजन चाचण्या होतात. कोरोनाची चाचणी करण्यासाठी या चाचणी केंद्रावर महिला व नागरिकांची मोठी रांग असते. या रांगेवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने चाचणी देण्यासाठी आलेले नागरिक सोशल डिस्टन्सचे पालन करत नाहीत. अस्ताव्यस्त लाईन पसरलेल्या असतात तर स्वॅब देण्यासाठी आलेले अनेक नागरिक व युवक वसतिगृहाच्या परिसरात कुठेही खुलेआम फिरतात. यावर कोणाचेही कसलेही नियंत्रण नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारीही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने वाढत्या गर्दीवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.
अँटिजन टेस्ट केलेल्या किट टाकल्या जातात मैदानावरच
या चाचणी केंद्रात बहुतांश नागरिकांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटिजन टेस्ट केल्या जातात. ही अँटिजन टेस्ट करण्यासाठी वापरण्यात आलेल्या किटची व्यवस्थित विल्हेवाट न लावता त्या किट वसतिगृहाच्या मैदानावरच फेकून दिल्या जातात. प्रशासनाने या किटची व्यवस्थित विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. मात्र, असे न करता मैदानात टाकण्यात आलेल्या या किट संसर्ग वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू शकता, याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली पाहिजे.
वेळ अपुरा पडत असल्याने गर्दी वाढली.
कोरोना चाचणी करण्यासाठी सकाळी १० ते दुपारी ४ ही वेळ ठेवण्यात आली आहे. चाचणी करण्यासाठी अंबाजोगाई शहरासह संपूर्ण तालुक्यातील लोकांची गर्दी चाचणी केंद्रावर होते. सकाळी १० ते १ आणि दुपारी तीन ते चार यावेळेत चाचण्या होतात. अशा स्थितीत चाचण्यांची वेळ वाढवावी व यासाठी लागणारा कर्मचारी वर्गही वाढविण्यात यावा, तरच या गर्दीवर नियंत्रण राखले जाईल.
यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्याकडे विचारणा केली असता चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चाचण्यांसाठी कर्मचारी वर्ग वाढवून द्यावा, यासाठी आपण वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवला आहे. तसेच या परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची मागणी करण्यात येणार असल्याचे डॉ. लोमटे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.