गटनेत्याने अधिका-यांना धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:44+5:302021-07-08T04:22:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी झूम ॲपद्वारे पार पडली. या सभेत गटनेते परमेश्वर खरात ...

गटनेत्याने अधिका-यांना धरले धारेवर
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी झूम ॲपद्वारे पार पडली. या सभेत गटनेते परमेश्वर खरात यांनी विविधप्रश्नी अधिकाऱ्यांना घेरले. अधिका-यांच्या कारभाराचे वाभाडे काढून त्यांनी प्रलंबित कामे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी यावेळी केली.
पंचायत समिती सदस्य तथा राष्ट्रवादीचे गटनेते परमेश्वर खरात यांनी विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आपली भूमिका मांडत अधिका-यांना खडसावले. तालुक्यात घरकुल योजनेत लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर होऊन एक दोन वर्षे उलटूनही त्यांना फक्त एकच हप्ता देण्यात आला आहे. त्या लाभार्थ्यांची अडवणूक होत आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत सुरू असलेली कामे आणि नरेगा योजनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. मनरेगामधील शेतकऱ्यांच्या शेततळ्यांच्या कामाची मागणी देऊनही मस्टर निघत नाहीत. शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते आहे. गेवराई-बंगाली पिंपळा रोडवरील वडगाव-चिखली येथील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले आहे. आतापर्यंत गुत्तेदाराने पुलाचे काम पूर्ण केले नाही. तयार केलेला साईड पूल दोनवेळेस वाहून गेला. त्यामुळे १५ ते १६ गावांचा संपर्क तुटला होता. त्या रखडलेल्या कामामुळे त्या नागरिकांचे हाल होत आहेत. तरी त्या पुलाच्या बांधकामाचा प्रश्न तत्काळ संबंधित गुत्तेदारास सूचना देऊन पूर्ण करा, असे अभियंता मोरे यांना सुचवले आहे.
....
आरोग्य, कृषीचा आढावा नाही
तालुका कृषी अधिकारी हे पंचायत समिती मासिक सभेस हजर राहून अद्यापपर्यंत कृषी विभागाचा आढावा देत नाहीत. कृषी विभागाच्या योजनांची माहितीही देत नाहीत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम हे पंचायत समिती सभागृहात कोरोना काळातील कसलीही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. ते बैठकीस हजरही राहत नाहीत. याबाबतही खरात यांनी आक्रमक भूमिका मांडली. बैठकीत गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.