groom dies five days after marriage due to heart attack in beed | लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू; कुटुंबावर शोककळा
लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू; कुटुंबावर शोककळा

बीड : लग्न झाल्यानंतर पत्नीसोबत देवदर्शन केले. त्यानंतर घरी येऊन थोडाफार पाहुणचार झाला. रविवारी सकाळी अचानक नवरेदवाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. यामुळे घरातील कुटुंबावर शोककळा पसरली. वडवणी तालुक्यातील खडकी येथे ही घटना घडली. 

अशोक सुग्रीव करांडे (२७, रा. खडकी ता. वडवणी) असे मृत्यूमुखी पावलेल्या नवरदेवाचे नाव आहे. २१ मे रोजी अशोकचे लग्न माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथे थाटात पार पडले होते. घरी आल्यावर अशोक जोडीने देवदर्शनासाठी गेला. रविवारी सकाळी ९ वाजता बहिणीच्या मुलांना कपडे आणण्यासाठी अशोक दुचाकीवरुन खडकी येथून वडवणीकडे जात होता. वडवणी शहराजवळ आल्यावर त्यास अचानक भोवळ आली. त्यानंतर तो दुचाकीवरुन खाली कोसळला. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यास मयत घोषित केले. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबद्दलची माहिती समजताच त्यात्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या प्रकरणी रुग्णालय चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

सुखी संसाराचे स्वप्न भंगले
अग्नीला साक्षी ठेऊन अशोकने पत्नीसह सुखी संसाराचे स्वप्न रंगवले होते. मात्र, यावर अवघ्या पाचच दिवसांत विरजण पडले. अशोक हा नागपूरला एका कंपनीत नोकरीला होता. त्याचे आई-वडील शेती करतात. एक भाऊ आणि दोन बहिणी असा त्यांचा परिवार आहे.
 


Web Title: groom dies five days after marriage due to heart attack in beed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.