ग्रामपंचायतीची रणधुमाळी प्रचारापेक्षा सोशल मीडियावरच जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:54+5:302021-01-13T05:27:54+5:30
अविनाश कदम आष्टी : तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारापेक्षा सोशल मीडियाचा ...

ग्रामपंचायतीची रणधुमाळी प्रचारापेक्षा सोशल मीडियावरच जास्त
अविनाश कदम
आष्टी : तालुक्यात ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारापेक्षा सोशल मीडियाचा वापर जास्त होत आहे. आमचा नेता लई पावरफुल्ल, सरपंच पदाचे दावेदार, ध्यास परिवर्तनाचा, गावच्या सर्वांगीण विकासाचा, प्रारंभ नव्या युगाचा नव्या पर्वाचा, तुमच्या राजाला साथ द्या असे आवाहन करणाऱ्या व्हिडिओ क्लिपमधून सध्या पॅनल प्रमुख उमेदवाराचे गुणगान गात आहेत.
आष्टी तालुक्यात एकमेव शेरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ७५ जागांसाठी १६३ उमेदवार रिंगणात आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीत सर्वाधिक दुरंगी लढती आहेत. अनेक वर्षे हाती सत्ता गाजवणाऱ्या गावपातळीवर नेत्यांना मात्र स्थानिक नागरिकांकडून चांगलेच आव्हान दिले जात आहे. काही गावात पारंपरिक विरोधक एकत्र येऊन तिसऱ्या गटाला आवाहन देत आहेत. यंदा मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी जास्त प्रमाणात न घेता विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे.
तरुणच करतील गावाचे नेतृत्व
आमचा नेता लई पॉवरफुल,सरपंच पदाचे दावेदार, ध्यास परिवर्तनाचा गावच्या सर्वांगीण विकासाचा, प्रारंभ नव्या युगाचा नव्या पर्वाचा, तुमच्या राजाला साथ द्या, फक्त विकासासाठी मत द्या,चोरांच्या हातात नाही पोरांच्या हातात द्या, आता गावातले तरुणच करतील गावाचे नेतृत्व आदींसह विविध गाण्यांचे रिमिक्स ऑडिओ, व्हिडिओ क्लिप बसवून मतदारांना आकर्षित केले जात आहे.
दिग्गज पडद्याआड; तरुणांचा भरणा
तुम्ही लढा आम्ही पाठीशी आहेत, असे म्हणत गावातील काही दिग्गज निवडणुकीपासून दोन हात लांब राहत पडद्यामागून सूत्रे हलवत असल्याचे चित्र दिसत आहे. यंदा निवडणुकीमध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणावर भरणा झाला असून यंदाच्या निवडणुकांमध्ये चुरस पहावयास मिळत आहे.
७५ जागांसाठी १६३ उमेदवार
आष्टी तालुक्यातील बारा पैकी १ शेरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर धनगरवाडी १,सुबेवाडी २,खुटेफळ, पुडी - १, सोलापुरवाडी - १, डोईठाण १ असे सहा गावातील उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर ११ ग्रामपंचायतीमध्ये ७५ जागेसाठी १६३ उमेदवार उभे असून त्यामध्ये महिला - ९८, पुरूष - ६५ अशी माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली.