माजलगावातील शासकीय कोविड सेंटर सुरूच नाही, पॉझिटिव्ह रुग्णांना घ्यावा लागतोय खासगी सेंटरचा सहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST2021-03-09T04:36:14+5:302021-03-09T04:36:14+5:30
माजलगाव शहरालगत असलेल्या केसापुरी येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात शासकीय कोविड सेंटर चालू होते. या ठिकाणी जागा प्रशस्त असल्याने ...

माजलगावातील शासकीय कोविड सेंटर सुरूच नाही, पॉझिटिव्ह रुग्णांना घ्यावा लागतोय खासगी सेंटरचा सहारा
माजलगाव शहरालगत असलेल्या केसापुरी येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात शासकीय कोविड सेंटर चालू होते. या ठिकाणी जागा प्रशस्त असल्याने रुग्णांची या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुविधा मिळत असे. परंतु ३-४ महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे शासकीय कोविड सेंटर बंद करण्यात आले होते.
माजलगाव तालुक्यात मागील ८ ते १० दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतानादेखील येथील शासकीय कोविड सेंटर अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना औरंगाबाद, बीड, पुणे आदी ठिकाणी खासगी रुग्णालयाचा सहारा घ्यावा लागतो आहे. त्यामुळे या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड होऊ लागला आहे. यामुळे येथील शासकीय कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
व्यापारी फिरवत आहेत पाठ
दररोज छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. यामुळे व्यापाऱ्यांनी कोरोनाची टेस्ट करावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असताना व्यापारी याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठ दिवसांत १५० ते २०० व्यापाऱ्यांनीच टेस्ट करून घेतली आहे.
आपल्याकडील व्यापाऱ्यांना अनेक वेळा आवाहन करूनही ते टेस्ट करत नसल्याने रुग्णांची संख्या कमी आहे. यामुळे शासकीय कोविड सेंटर चालू करण्याएवढी संख्याच नसल्याने सध्या तरी हे सेंटर चालू करणे अशक्य आहे. जे रुग्ण पॉझिटिव्ह निघत आहेत, त्यांची अंबाजोगाई व इतरत्र सोय करण्यात येत आहे.
- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी