होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान! - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:31+5:302021-07-04T04:22:31+5:30
बीड : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात तीव्र राहिली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. ...

होऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान! - A
बीड : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात तीव्र राहिली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनाने कडक निर्बंध लावले होते. त्यामुळे मंगल कार्यालये बंद होती, तर विवाहाच्या अनुषंगाने आवश्यक सर्व व्यवसायांना फटका बसला. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे ठरलेली लग्नसोहळे पुन्हा लांबणार, असे वाटत असतानाच, काही अटींच्या आधारे लग्नांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लगीनघाई जोरात सुरू आहे. बाजारात कपडे, दागिने, गृहपयोगी साहित्य खरेदीसाठी दुकानांवर वर्दळ पाहायला मिळत आहेत. रीतिरिवाजानुसार लग्न करण्यावर भर देतानाच, आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर, कॅटरिंग, मंडप, बँड आचारी आणि मजुरांना कामे मिळू लागली आहेत. ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा असली, तरी पावसाच्या दिवसात फजिती होऊ नये, म्हणून मंगल कार्यालय, हॉटेलची बुकिंग वाढली असून, तारखा आरक्षित झाल्याने अनेक लग्न आयोजकांना शोधाशोध करावी लागत आहे.
परवानगीसाठी अग्निदिव्य
लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या ५० लोकांची नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, मंगल कार्यालय, मॅरेज हॉल हॉटेल मालकाचे नाव आदी माहिती आयोजकांना द्यावयाची आहे, तसेच त्यांची अँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी करून अहवाल वेळेत उपलब्ध करून घ्यावा लागतो. नंतर पोलीस प्रशासनाची परवानगी व ग्रामीण भागात ग्रामपंचायत व शहरी भागात नगरपंचायत, नगरपालिकेची परवानगीसाठी चकरा माराव्या लागतात. हे सोपस्कार पार पाडताना यजमानांची मात्र दमछाक होते. या परवानगी प्रक्रियेला कधी दोन तर कधी चार-पाच दिवस लागतात.
या असतील अटी
लग्नसोहळ्यासाठी प्रशासकीय अटी घालून दिल्या आहेत. उपस्थित राहणाऱ्या ५० जणांची अँटिजन आणि आरटीपीसीआर तपासणी अहवाल निगेटिव्ह असल्याबाबतची खात्री
पोलीस विभागाने करावयाची आहे. त्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घ्यावी लागते. लग्नाच्या वेळी भेट देण्याचे व निरीक्षण करण्याचे संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना निर्देश दिलेले आहेत. विवाह स्थळी पुरेसे सॅनिटायझर उपलब्ध करणे, मास्क घालणे बंधनकारक करण्याची जबाबदारी आयोजकांवर सोपविली आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाय करणे, बैठक व्यवस्था व भोजन व्यवस्थेत सोशल डिस्टन्सचे नियोजन करणे आवश्यक केले आहे. घरी जरी लग्न आयोजित केले जाणार असेल, तरी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक आहे.
शुभमुहूर्त
जुलैमध्ये १, २, ३, १३ या तारखांना शुद्ध मुहूर्त आहे, तर २२, २५, २६, २८, २९ या तारखांना गौण विवाह मुहूर्त आहेत, याशिवाय वर-वधू पक्ष दोघे मिळून सोयीचा मुहूर्त शोधण्यात दंग आहेत.
वधू-वर पित्याची कसरत
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने नियमांचे बंधन घालून दिलेले आहे. लॉकडाऊनमध्ये विवाह सोहळा करता आला नाही. आता निर्बंध काहीसे शिथिल केले आहेत. नियमांचे पालन करून विवाह सोहळा करणार आहोत. त्यासाठी आवश्यक परवानगी घेत आहोत. लगीनघाईत हे एक काम वाढले आहे.
- संजय जगदाळे, वधुपिता, बीड.
--------
कोरोना टाळण्यासाठी प्रशासनाचे नियम योग्य आहेत, परंतु ५० जणांच्या कोरोना चाचणीचा नियम जाचक वाटतो. बाजारात व इतरत्र अनावश्यक गर्दी होते, तिकडे दुर्लक्ष केले जाते. मग पवित्र लग्न सोहळ्यासाठी बंधने कशामुळे? लग्नविधी होईपर्यंत नियम पालनाची आयोजकांना काळजी वाटते.
- दिलीप खिंवसरा, बीड.
----------------