दारुड्या नवऱ्याचा प्रताप; पत्नीवर कत्तीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST2020-12-27T04:24:52+5:302020-12-27T04:24:52+5:30
आष्टी : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने माहेर गाठले. पतीने मद्यधुंद अवस्थेत तिथेही पोहोचून पत्नीच्या चेहऱ्यावर कत्तीने वार करून ...

दारुड्या नवऱ्याचा प्रताप; पत्नीवर कत्तीने वार
आष्टी : दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने माहेर गाठले. पतीने मद्यधुंद अवस्थेत तिथेही पोहोचून पत्नीच्या चेहऱ्यावर कत्तीने वार करून तिला जखमी केले. ही घटना २२ डिसेंबर रोजी रात्री आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे घडली.
जया सुरेश जाधव (रा. पौंडुळ नं. ३, ता. शिरूर) असे त्या पीडितेचे नाव आहे. जयाचा पती सुरेश पवार हा दारू पिण्याच्या सवयीचा आहे. सुरेशच्या सततच्या मारहाणीला कंटाळून जया दीड महिन्यापासून माहेरी देवळाली पानाची येथे राहत आहे. मंगळवारी रात्री जया मुलांसह घरासमोरील ओट्यावर झोपली होती. रात्री १० वाजेच्या सुमारास सुरेश मद्यधुंद अवस्थेत तिथे आला. जयाला झोपेतून उठवत ‘तुला नांदायचे नाही का,’ असा जाब विचारात त्याने तिच्या चेहऱ्यावर कत्तीने वार करून जखमी केले.
जयाचा आरडाओरडा ऐकून तिची मुले आणि बहीण उठली. आईला मारू नका, अशी गयावया मुले करत असतानाही सुरेशने लाथाबुक्क्यांनी जयाला बेदम मारहाण करत शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत निघून गेला. जखमी अवस्थेतील जयाला तिच्या भावाने आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दखल केले. तिच्या फिर्यादीवरून सुरेश पवार याच्यावर अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.