केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:23 IST2021-06-25T04:23:55+5:302021-06-25T04:23:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने ...

केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी गुरुवारी एका निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे केली आहे.
शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशरी रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती ठराविक धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार त्यांना काही ठराविक दराने फक्त दोन महिने धान्य पुरवठा करण्यात आला. त्यानंतर केशरी रेशनकार्डधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केशरी रेशनकार्डधारकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ज्या केशरी रेशनकार्डधारकांचे उत्पन्न ४९ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा रेशनकार्डधारकांना धान्य दिले जात नाही. त्यामुळे केशरी रेशनकार्ड धारक धान्यापासून वंचित आहेत. केशरी कार्डधारकांसाठी असलेली उत्पन्नाची अट त्वरित रद्द करून सर्व केशरी रेशनकार्डधारकांना विनाअट धान्य पुरवठा करण्याची मागणी महादेव आदमाने यांनी केली आहे. तरी केशरी रेशनकार्डधारकांना लावलेली उत्पन्नाची अट काढून धान्य पुरवठा करावा अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आदमाने यांनी दिला आहे.
....
पूर्वी उत्पन्नाची अट नव्हती
पूर्वी सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे आदींना वगळून उर्वरितांची कार्ड केशरी होती. मात्र, त्यावेळी विशिष्ट अशा उत्पन्नाची अट नव्हती. हे सर्व केशरी रेशनकार्डधारक व्यावसायिक व शेतकरी होते. या सर्वांना धान्य पुरवठा होत होता. मात्र पुन्हा नियम बदलल्याने हा मिळणारा धान्य पुरवठा खंडित झाला आहे.