परळी: देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंदिर परिसरात चालू असलेल्या तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहामध्ये बैठकीसाठी हजर झाले. दरम्यान, विश्रामगृहाच्या बाहेर मराठा सेवकांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शिवराज दिवटे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी केली. न्याय द्या न्याय द्या, अजित पवार न्याय द्या, अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच परळी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्यांचे जंगी स्वागत केलं गेलंय. या वेळी परळी शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक,राणी लक्ष्मीबाई टावर आणि वैद्यनाथ मंदिर परिसरामध्ये फुलांचे हार क्रेनवर लावण्यात आले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास कामाची केली पाहणी. त्यांच्यासोबत मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे , माजी आमदार संजय दौंड आदींची उपस्थिती होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री पवार छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शासकीय विशेष अतिथी विश्रामगृहामध्ये बैठकीसाठी हजर झाले.
बैठकीनंतर उपमुख्यमंत्री पवार बाहेर आले तेव्हा मराठा सेवकांनी निवेदन सादर केले. लिंबुटा येथील युवक शिवराज दिवटे हल्ला प्रकरणी आंदोलक आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाली. पोलीस विनाकारण जलालपूरच्या ग्रामस्थांना पकडत आहेत अशी तक्रार करून शिवराज दिवटे यांना न्याय द्या, अशी मागणी ही आंदोलकांनी केली. यावर शिवराज दिवटे हल्ला प्रकरणी योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना ४८ तासांच्या आत अटक करण्याच्या सूचना पवार यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे.
आज परळी बंदची हाकशिवराज दिवटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय आणि विविध संघटनांनी परळीत बंद पुकारला आहे. सकाळी काही वेळ बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मात्र, अकरा वाजेनंतर बाजारपेठे सुरळीत सुरू होती. बंदचे आवाहन करणाऱ्या दोघांना पोलिसांनी सकाळपासून नजर कैदेत ठेवले असल्याची माहिती आहे.
परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये बैठकाअजित पवार हे सोमवारी परळी, अंबाजोगाई आणि बीडमध्ये विविध बैठका घेतील. तसेच पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समितीची दुसरी बैठक होणार आहे. मंत्री अजित पवार यांच्यासोबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार आहेत. यात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था संदर्भात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.