गर्भातच खुडल्या कळ्या; आरोग्य मंत्र्यांच्या धाराशिवसह २२ जिल्ह्यांतील लिंग गुणाेत्तर घटले

By सोमनाथ खताळ | Published: March 13, 2024 06:39 PM2024-03-13T18:39:04+5:302024-03-13T18:40:18+5:30

गर्भलिंग निदान व गर्भपात रोखण्यात अपयश : पुणे उपसंचालकांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र

girl fetus sprouted in the womb; The gender ratio in 22 districts decreased, including Health Minister Dharashiv | गर्भातच खुडल्या कळ्या; आरोग्य मंत्र्यांच्या धाराशिवसह २२ जिल्ह्यांतील लिंग गुणाेत्तर घटले

गर्भातच खुडल्या कळ्या; आरोग्य मंत्र्यांच्या धाराशिवसह २२ जिल्ह्यांतील लिंग गुणाेत्तर घटले

बीड : राज्यात गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याचे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. कडक कायदे करूनही हा बाजार बंद करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे येथील राज्य कुटुंब कार्यालयाच्या पत्रानुसार राज्यातील २२ जिल्ह्यांतील लिंग गुणोत्तर घटले आहे. यामध्ये आजी-माजी आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांचाही समावेश आहे. २०१९ सोबत २०२२ ची तुलना करण्यात आली आहे. या आकडेवारीवरून आजही गर्भातच कळ्या खुडल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात करणे हे कायद्याने गुन्हा आहे. यासाठी ‘पीसीपीएनडीटी’ कायदाही आहे; परंतु याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानेच गर्भलिंग निदान व गर्भपात होत असल्याचा संशय उपसंचालकांनी व्यक्त केला आहे. याचाच आढावा अतिरिक्त संचालकांनी २९ जानेवारी २०२४ रोजी घेतला. यामध्ये २२ जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर घटल्याचे उघड झाले आहे. याच अनुषंगाने उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांनी २२ जिल्ह्यांच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र काढून गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या प्रकाराने राज्यातील गर्भलिंग निदान व गर्भपाताबाबत कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. याबाबत उपसंचालक डॉ. रेखा गायकवाड यांना संपर्क केला; परंतु त्यांनी फोन घेतला नाही.

बीडसह आठ जिल्ह्यांत समाधानकारक
सर्वांत आगोदर बीड जिल्ह्यातील परळीमध्ये डॉ. सुदाम मुंडे याने गर्भातच कळ्या खुडल्याचे उघड झाले होते. यामध्ये त्याला शिक्षाही झाली होती; परंतु २०२३ मध्ये बीडचे लिंग गुणोत्तर हे हजार मुलांमागे ९३४ एवढे होते. यासोबतच राज्यातील इतर आठ जिल्ह्यांमध्येही लिंग गुणोत्तर समाधानकारक असल्याचे समोर आले आहे.

जालन्याची आकडेवारी चिंताजनक
राज्यात सर्वांत जास्त लिंग गुणोत्तर हे जालना जिल्ह्यात घटले आहे. २०१९ मध्ये या जिल्ह्यात १०२२ एवढे होते. तेच आता २०२२ मध्ये कमी होऊन ८५४ वर आले आहे. तब्बल १६८ ने या जिल्ह्यात घट झाली आहे. त्यानंतर अकोल, नांदेड, सांगली या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

काय आहेत कारणे?
बीड जिल्ह्यात २०२२ मध्ये अवैध गर्भपात, तर २०२४ मध्ये अवैध गर्भलिंग निदानाचे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. यात केवळ मुलगी नको, हेच मुख्य कारण राहिलेले आहे. पहिली मुलगी झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून दुसरा मुलगा पाहिजे, याच भावनेतून त्यांनी गर्भलिंग निदान केल्याचे स्पष्ट झालेले आहे.

जिल्हा २०१९ २०२2 फरक
सिंधुदुर्ग ९६१ ९५० - ११
लातूर ९३० ९१८ - १२
सोलापूर ९२३ ९११ - १२
नाशिक ९१० ८९७ - १३
गडचिरोली ९५४ ९४० -१४
अहमदनगर ८९३ ८७९ - १४
नागपूर ९४२ ९२३ - १९
धुळे ९०३ ८८३ - २०
परभणी ९३० ९१० - २०
अमारवती ९५२ ९३० - २२
औरंगाबाद ९०९ ८८६ - २३
रायगड ९५५ ९२४ - ३१
यवतमाळ ९३२ ८९३ - ३९
उस्मानाबाद ९१३ ८७४ - ३९
भंडारा ९४५ ९०५ - ४०
रत्नागिरी ९५३ ९११ - ४२
गोंदिया ९८९ ९४७ - ४२
नंदुरबार ९६३ ९१६ - ४७
सांगली ९०६ ८५७ - ४९
नांदेड ९५६ ९०७ - ४९
अकोला ९५२ ९०२ - ५०
जालना १०२२ ८५४ - १६८

Web Title: girl fetus sprouted in the womb; The gender ratio in 22 districts decreased, including Health Minister Dharashiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.