गतवर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार बिघडले.
लॉकडाऊन सुरू झाले, त्यामुळे कापूस हंगामात कापसाची खरेदी उशिरा म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सुरू करण्यात आली. त्यावेळी शासनाने जिनिंग मालकांना १५ ऑगस्टपर्यंत कापूस खरेदी करण्यास भाग पाडले म्हणून शासनास तोटा झाला. या खरेदी काळात माजलगाव तालुक्यातील सुरू असलेल्या मनकॉट, पूर्वा, अभिनंदन, पीएस कॉटन, मोरेश्वर, अंबादास, महाराष्ट्र कॉटन या सात जिनिंगवर शासकीय दराने खरेदी केलेल्या कापसातून रुई व सरकी वेगळी करून गठाण पॅकिंग करून मालवाहू वाहनात भरून देण्यात येते. त्याचा सर्व खर्च पणन महासंघ अदा करते. माजलगाव येथील सात जिनिंगचे ३५ लाख ते १ कोटी १० लाख याप्रमाणे सर्वांचे मिळून चार कोटी रुपये तर कापूस, गठाण यांची चढउतार करणाऱ्या हमालांची हमाली ६० लाख रुपये, व गठाण वाहतुकीची १ कोटी रुपये याप्रमाणे जवळपास सहा कोटी रुपये पणन महासंघाकडे थकीत आहेत. ही रक्कम देण्यात यावीत, यासाठी पणनमंत्री व कार्यकारी संचालक यांचेकडे पत्रव्यवहार करण्यात आला; परंतु काहीच उपयोग झाला नाही. अगोदरच कोरोनामुळे जिनिंगची आर्थिक परिस्थिती बिघडलेल्या अवस्थेत असतांना २०-२१ च्या कापूस हंगाम सुरू कसा करायचा, असा प्रश्न चालकांकडे होता, म्हणून केंद्र सुरू करण्यास नकार देऊन बहिष्कार घातला होता. मात्र महासंघाने पैसे तर दिलेच नाहीत उलट काही जिनिंग चालकाकडून बँक गॅरंटी म्हणून १०-१२ लाख रुपयांचे डी डी घेण्यात आले, अशी माहिती जिनिंग संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर होके यांनी दिली. दरम्यान, पणन महासंघाच्या धोरणाविरुद्ध संपूर्ण राज्यात ११, १२ रोजी जिनिंग बंद ठेवण्यात येणार आहेत
पणन महासंघाने जिनिंग चालक, हमाल, वाहतूकदार यांच्याबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीची मार्केट फीस २ कोटी रुपये थकीत ठेवली आहेत, याबाबत वारंवार पाठपुरावा करूनदेखील रक्कम मिळालेली नाही.
-
-एच.एन. सवणे, सचिव, बाजार समिती, माजलगाव.