गेवराईत औषधी दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:47+5:302021-03-07T04:30:47+5:30
गेवराई : जागा मालकाची खोटी स्वाक्षरी करून बनावट कागदपत्रांआधारे बोगस भाडेपत्र सादर केल्याप्रकरणी शहरातील मोमीनपुरा भागातील हिना मेडिकल स्टोर्सचा ...

गेवराईत औषधी दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द
गेवराई : जागा मालकाची खोटी स्वाक्षरी करून बनावट कागदपत्रांआधारे बोगस भाडेपत्र सादर केल्याप्रकरणी शहरातील मोमीनपुरा भागातील हिना मेडिकल स्टोर्सचा परवाना १ जून २०२१ पासून कायमस्वरूपी रद्द केला आहे. तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासात अशाप्रकारची कठोर कारवाई पहिल्यांदाच करण्यात आल्याने औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
सय्यद अब्दुल रहेमान सय्यद महेमूद यांच्या पत्नीच्या मालकीचे गेवराई शहरातील मोमीनपुरा भागात घर क्रमांक ४६५/२ आहे. याबाबत त्यांनी बीडच्या अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. हिना मेडिकल स्टोर्सचे परवानाधारक सय्यद अय्युब सय्यद इब्राहीम याने सदर जागेबाबत नियमांचे उल्लंघन करून खोटे व बनावटी भाडे करारनामा व खोटे कागदपत्र तयार करून अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जमा केले. त्याआधारे औषध विक्रीचा परवाना हस्तगत केला. तसेच शंभर रुपयाच्या बाँडवर व भाडे करारपत्रावर माझी खोटी सही करून प्रशासनाची दिशाभूल तर माझी फसवणूक केली. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा मेडिकल परवाना रद्द करावा, अशी मागणी केली.
या तक्रारीची बीडच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त रा.बा. डोईफोडे यांनी गंभीर दखल घेतली. या प्रकरणाची कसून चौकशी केली. मेडिकलच्या तपासणीत अनेक त्रुटी आढळून आल्या. जागेच्या भाडेपत्रावरील स्वाक्षरी ही मूळ जागा मालकाचीच आहे. याबाबत सय्यद अय्युब हा कोणताही पुरावा सादर करू न शकल्याने त्यांच्या हिना मेडिकल स्टोअर्सचा औषध विक्रीचा परवाना १ जून २०२१ पासून कायमस्वरूपी रद्द केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या या कठोर कारवाईमुळे गेवराई तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.