सोने चोरणारी महिला टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:31+5:302021-02-05T08:28:31+5:30
बीड : बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन बॅगमधील आणि महिलांच्या गळ्यातील सोने चोरणाऱ्या महिला टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश ...

सोने चोरणारी महिला टोळी गजाआड
बीड : बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन बॅगमधील आणि महिलांच्या गळ्यातील सोने चोरणाऱ्या महिला टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला असून, दोन महिलांना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की, बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या महिला सोनी चव्हाण, रोहिणी चव्हाण या चोरलेले दागिने विक्री करण्यासाठी कार (क्र.एम.एच.१२ जे.यू. ४५०० ) या गाडीतून गेवराईहून बीडकडे येत आहेत. यावेळी जालना रोडवरील संगम हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा लावून त्या गाडीला अडविले. यावेळी गाडीतील चालक कार बाजूला उभा करून त्या ठिकाणावरून पळून गेला. तर त्यामध्ये सोनी चव्हाण (रा.नागझरी ता.गेवराई), रोहिणी शहादेव चव्हाण (रा.बांगरनाला, बालेपीर बीड) या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून एक सोन्याचे गंठण, एक पट्टीचे गंठण व एक मणीमंगळसूत्र असा एकूण १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी हे दागिने नेकनूर बसस्थानक, मांजरसुंबा ते बीड बस प्रवासात, धारूर बसस्टँड, धारूर ते माजलगाव एस.टी.बस प्रवासात, माजलगाव ते तेलगाव बस प्रवासात चोरी केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईत कार आणि सोने असा ७ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी नेकनूर पोलिसांच्या ताब्यात आरोपींना देण्यात आले आहे. या महिलांकडून इतर गुन्हे व आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातून पोलीस तपास करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.