रुग्णांना उपचार मोफत; पाणी मात्र विकतचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:52+5:302021-07-08T04:22:52+5:30
पुरुषोत्तम करवा/ लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : रुग्णांना उपचार मोफत मिळतात; परंतु येथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी मात्र विकत घ्यावे ...

रुग्णांना उपचार मोफत; पाणी मात्र विकतचे
पुरुषोत्तम करवा/
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : रुग्णांना उपचार मोफत मिळतात; परंतु येथे रुग्णांना पिण्यासाठी पाणी मात्र विकत घ्यावे लागत आहे. अशी स्थिती सध्या माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाहायला मिळत आहे. यामुळे रुग्णांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
माजलगाव ग्रामीण रुग्णालयात फिल्टर पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र कित्येक महिन्यापासून फिल्टर बंद अवस्थेत आहे. रुग्णांना तसेच कोरोना लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. त्यामुळे मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती संभाजी शेजूळ यांनी याची दखल घेऊन या ठिकाणी थंड पाण्याच्या जारची व्यवस्था केली होती. किमान महिनाभर ही सोय सुरू असल्याने नागरिकांची मोठी सोय झाली होती; परंतु शासनाकडून काही दिवस लस पुरवठा बंद झाल्याने बाजार समितीने पाणी जार बंद केले. त्यावर आता महिना झाला. पुन्हा लस सुरू झाली असून ती घेण्यासाठी वृद्धांपासून तरुण पिढी रुग्णालयात येत आहे. त्याचबरोबर इतर उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात; मात्र त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तहान लागली तर रुग्णांना पाण्यासाठी बाहेर जाऊन विकतच्या बाटल्या पदरमोड करून खरेदी कराव्या लागतात अशी परिस्थिती येथे आहे. याबाबत तातडीने वरिष्ठांनी दखल घेऊन कायमस्वरूपी फिल्टर पाण्याची व्यवस्था करावी ,अशी मागणी होत आहे.
....
ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य, गोरगरीब रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेण्यासाठी येतात. ते या ठिकाणी चार, पाच दिवस जर उपचारासाठी दाखल झाले तर त्यांच्यासोबत एक, दोन व्यक्ती सोबत असतात, परंतु या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना विकत पाणी आणावे लागत आहे. यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी खासगी दवाखान्यात उपचार घेतला असता तर पाण्याएवढे पैसे लागले नसते असे रुग्णांच्या नातेवाईकातून बोलले जात आहे.
--------
ग्रामीण रुग्णालयात फिल्टर बसविण्यात आले आहेत. याठिकाणी बसविण्यात आलेले फिल्टर नादुरुस्त झाल्यास यावर मोठ्या प्रमाणात खर्च येतो. सध्या येथील फिल्टर दुरुस्तीअभावी बंद आहेत. ते लवकरच दुरुस्त करून घेण्यात येईल.
-डॉ.गजानन रूद्रवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, माजलगाव.
......
070721\img_20210629_120507_14.jpg~070721\img_20210616_113858_14.jpg