शेअर मार्केटमधून नफा झाल्याचे सांगून २४ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST2021-03-07T04:31:12+5:302021-03-07T04:31:12+5:30
बीड : शेअर मार्केटमधील विविध प्लॅन दाखवून नफा झाल्याचे सांगून एका स्थापत्य अभियंत्यास २४ लाख २९ हजार ८३४ रुपयांना ...

शेअर मार्केटमधून नफा झाल्याचे सांगून २४ लाखांची फसवणूक
बीड : शेअर मार्केटमधील विविध प्लॅन दाखवून नफा झाल्याचे सांगून एका स्थापत्य अभियंत्यास २४ लाख २९ हजार ८३४ रुपयांना गंडा घातल्याची घटना २१ जानेवारी ते ३ मार्च दरम्यान घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदयसिंह प्रतापराव जगताप (रा. दत्तनगर बीड) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. त्यांना शेअर मार्केटच्या विविध प्लॅनमधून नफा झाला आहे, असे सांगण्यात आले. तसेच त्यासाठी शुल्क आकारावे लागते, त्यासाठी तुम्ही खात्यावर पैसे भरा, असे सांगण्यात आले. दरम्यान, जाधव यांनी ८२७६८५८२२९, ९१७४०६४८०४, ७५०१६६९४१४ या मोबाइल क्रमांकावरून गुगल पे, बँक पेमेंट, आरटीजीएस, एनईएफटीच्या माध्यमातून जवळपास २४ लाख २९ हजार ८३४ रुपये भरले. हे पैसे १ जानेवारी ते २ मार्च दरम्यान संबंधित खात्यावर जाधव यांनी भरले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर उदयसिंह जाधव यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेप्रमुख पो.नि. साईनाथ ठोंबरे करत असून, हा तपास सायबर क्राइमकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे साईनाथ ठोंबरे यांनी सांगितले.
ऑनलाइन फसवणूक प्रकार वाढले
ऑनलाइन बँकिंग किंवा पैसे पाठवण्यासाठी वापण्यात येणाऱ्या विविध स्वॉफ्टवेअरच्या माध्यमातून गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी बीड पोलीस सायबर क्राइमकडून कार्यवाही केली जात आहे. मात्र, नागरिकांनीदेखील बॅंक खात्यासंदर्भात गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, जेणेकरून आर्थिक फसवणूक टाळता येईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.