स्कीमचे आमिष दाखवून फसवणूक, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:31 IST2021-03-06T04:31:32+5:302021-03-06T04:31:32+5:30
कडा : पब्लिक ट्रस्टची स्थापना करून पैसे भरण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

स्कीमचे आमिष दाखवून फसवणूक, गुन्हा दाखल
कडा : पब्लिक ट्रस्टची स्थापना करून पैसे भरण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी तीन आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथील सचिन सोपान मुंगसे यांच्या घरी जाऊन अजय खोसे हे अध्यक्ष तर ललिता मकासरे या सचिव असलेल्या नोंदणीकृत हेल्थ फाऊंडेशन पब्लिक ट्रस्टची स्थापना केल्याचे सांगून ६५० रुपये भरून सभासद होण्याचे सांगितले. सचिन व १७ सभासदांनी ११ हजार ७०० रुपये स्किमच्या नियमाप्रमाणे वेळोवेळी भरले. त्यानुसार १ लाख ५९ हजार ८०० रुपये मिळणे अपेक्षित असताना बँक खात्यावर ९ हजार ५०० रुपये जमा करून ३१ ऑगस्ट २०२० रोजी स्कीम बंद केली. त्यानंतर अजय खोसे याने काही रक्कम दिली. उर्वरित रक्कम देण्यास नकार दिला. स्कीम बंद करून ७६ हजारांची फसवणूक केल्याने सचिन मुंगसे याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात आरोपी अजय खोसे, ललिता मकासरे, आनंदवाडी ता. कर्जत, सुधाकर मकासरे रा. वांबोरी ता. राहुरी, हरिदास वाटोळो रा. वाळुज पारगाव ता. आष्टी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे करीत आहेत.