सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:51+5:302021-07-08T04:22:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रात इतर विभागात सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखो ...

सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रात इतर विभागात सौर कृषी पंप योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. या फसवणुकीविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात जलसंजीवनी सौर पंप योजनेच्या नावाने अनेक शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक करून कंपनीचालक फरार झाले आहेत. याबाबत केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये काही शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या आहेत.
जलसंजीवनी ग्रामविकास संस्थेंतर्गत सुदर्शन सौर पंप शासकीय योजनेमधून मिळणार आहे. यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावेत. अशा प्रकारची जाहिरात करून भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांशी या कंपनीमार्फत संपर्क करून पैसे भरून घेण्यात आले. कालांतराने संपर्कासाठी देण्यात आलेले मोबाइल बंद करण्यात आले. यात शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत केज तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस स्टेशनमध्ये या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असेही मुंदडा यांनी निवेदनात म्हटले आहे.
...
पैसे द्या किंवा पंप बसवा
सौर पंप योजनेत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत त्वरित चौकशी करावी. या कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांनी सौर पंपासाठी भरलेली रक्कम परत द्यावी किंवा शेतकऱ्यांना सौर पंप बसवून देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना आदेश द्यावेत, अशी विनंतीही आमदार नमिता मुंदडा यांनी केली आहे.