चौथ्या दिवशी बीड येथील एआरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:47 IST2018-01-05T00:47:12+5:302018-01-05T00:47:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कायमस्वरुपी जबाबदार अधिकारी नसल्याने तीन दिवसांपासून कामकाज बंद होते. ...

चौथ्या दिवशी बीड येथील एआरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कायमस्वरुपी जबाबदार अधिकारी नसल्याने तीन दिवसांपासून कामकाज बंद होते. ‘लोकमत’ने ४ जानेवारी रोजी या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सलीम शेख यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी गुरुवारी कामावर रुजू झाले. त्यामुळे वाहनचालकांची कामे सुरू झाली.
येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज जानेवारीच्या सुरुवातीपासूनच तीन दिवस बंद होते. ४५ पदे मंजूर असलेल्या या कार्यालयाची धुरा केवळ १२ अधिकारी, कर्मचाºयांवर आहे. यातच कायमस्वरुपी अधिकारी नसल्याने कामकाज ढेपाळले होते. ट्रान्सफर, नोंदणी, कर वसुली, कर्जाचा बोजा चढविणे आदी कामे होत नसल्याने वाहन मालक वैतागले होते तर नागरिकांच्या पाठपुराव्यामुळे कर्मचारी दबावात होते.
अखेर गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सलीम शेख, सहायक मोटार वाहन निरीक्षक मुंडे, पवार यांच्यासह कॅशियर व क्लार्क आदी कर्मचारी दिसून आले. त्यामुळे वाहनधारकांची रखडलेली कामे सुरू झाली. प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दुपारी ४ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून कामकाजाचा आढावा घेत होते. कार्यालयाचे कामकाज सुरळीत झाल्याने वाहन मालकांनी सुटकेचा श्वास सोडला. वाहन पासिंगचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी होत आहे.