३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास दस्त नोंदणीसाठी चार महिन्यांची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST2021-03-27T04:34:40+5:302021-03-27T04:34:40+5:30
बीड : मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी ...

३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरल्यास दस्त नोंदणीसाठी चार महिन्यांची संधी
बीड : मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून
मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियमानुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आत नोंदणीसाठी सादर करता येतात. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे यांनी केले आहे.
स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्तऐवजांवर शासनाने ३१ मार्च २०२१ पर्यंत सूट जाहीर केली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व १२ दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता असल्याने हे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २९ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन राजपत्रानुसार, कोणत्याही स्थावर मिळकतीबाबतच्या अभिहस्तांरणपत्र किंवा विक्रीपत्राच्या दस्ताऐवजांवर उक्त अधिनियमास जोडलेल्या अनुसूची १ च्या अनुच्छेद २५ च्या खंड ( बी ) अन्वये अन्यथा आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होणाऱ्या आणि ३१ डिसेंबर २०२० रोजी संपणाऱ्या कालावधीकरिता दोन टक्के तर १ जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या व ३१ मार्च रोजी संपणाऱ्या कालावधीसाठी दीड टक्केने कमी केले आहे. तसेच, नगर विकास विभागाच्या ३१ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५च्या कलम १४७ ( अ ) अन्वये महानगरपालिका क्षेत्रात स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कावरील अधिभार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधी करिता अर्धा टक्के इतका कमी करण्यात आले आहे . तसेच २८ ऑगस्ट २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ अन्वये स्थावर मालमत्तेच्या अनुषंगाने आकारण्यात येणारा एक टक्का अधिभार हा १ सप्टेंबर २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधी करिता शून्य टक्के तर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्धा टक्के करण्यात आला आहे. शासनाने दिलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत ३१ मार्च अखेरपर्यंत असल्याने या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये गर्दी होऊ शकते. मार्च २०२१ पर्यंत मुद्रांक शुल्क सवलतीचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून ई चलनाद्वारे मुद्रांक शुल्क भरलेले उक्त दस्तऐवज नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम २३ अनुसार दस्त निष्पादित केलेल्या दिनांकापासून चार महिन्यांच्या आंत नोंदणीसाठी सादर करता येते. त्यामुळे कोविड -१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता मार्च २०२१ शेवटी दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी न करता, नोंदणी कायद्यातील तरतुदीचा लाभ घेण्याचे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल नढे व मुद्रांक सह दुय्यम निबंधक संजय गोपवाड (अंबाजोगाई) यांनी केले आहे.