महावितरणकडून केजमध्ये वीजबिलांची सक्तीने वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:24 IST2021-02-05T08:24:30+5:302021-02-05T08:24:30+5:30

केज : लॉकडाऊनच्या काळात वापरलेल्या विजेचे बिल माफ करण्याची भूमिका शासनाने घेतल्याने अनेक वीज ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल भरणा ...

Forced recovery of electricity bills in cage from MSEDCL | महावितरणकडून केजमध्ये वीजबिलांची सक्तीने वसुली

महावितरणकडून केजमध्ये वीजबिलांची सक्तीने वसुली

केज : लॉकडाऊनच्या काळात वापरलेल्या विजेचे बिल माफ करण्याची भूमिका शासनाने घेतल्याने अनेक वीज ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल भरणा केला नाही. मात्र वीजबिल तर माफ झालेच नाही उलट वीज ग्राहकांच्या दारात वीज कंपनीचे वसुली पथक जाऊन बिलाची सक्तीने वसुली करत असल्याचे चित्र शहरासह तालुक्यात दिसून येत आहे. घरगुती ग्राहकांनंतर वीज कंपनी शेती पंपाच्या वीजबिल वसुलीसाठी कामाला लागणार असल्याने शेतकऱ्यांनाही वसुलीचा शॉक बसणार आहे.

कोरोनाच्या काळात वीज ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे बिल माफ करण्याची भूमिका शासनाने घेतली होती. याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ३ नोव्हेंबर रोजी प्रसार माध्यमांना कोरोनाकाळातील वाढीव वीजबिलात सवलत देऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासन पूर्ण करण्यापूर्वीच त्यांनी पंधरा दिवसांच्या कालावधीत आपला शब्द फिरवला. वीज ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळणार नसल्याने वीज ग्राहकांनी वीज मीटरप्रमाणे बिलांचा भरणा करावे, असे सांगितले. मात्र याचा फटका नियमितपणे वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांना बसला. त्यातच कोरोनाकाळात वापरलेल्या विजेच्या अधिकच्या आलेल्या बिलाची ना दुरुस्ती, ना भरलेल्या बिलाची कपात यामुळे वीज ग्राहकांतून संताप व्यक्त होत आहे.

वसुलीसाठी पथक घरोघरी

वीज देयकाच्या वसुलीसाठी पथक तैनात करण्यात आल्याने कार्यालय सुनसान झाले आहे. घरगुती वीज ग्राहकांकडून वीजबिलाची सक्तीने वसुली चालू असतानाच शेतकऱ्याच्या शेतातील शेती पंपाच्या विजेची वसुली करण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही शेती पंपाच्या वीजबिल वसुलीचा शॉक बसणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सवलत योजना

शेतकऱ्यांसाठी वीज वितरण कंपनीने सवलत योजना चालू केली असून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सप्टेंबर २०२० च्या वीज पंपाच्या बिलातील ५० टक्के मूळ थकबाकी भरल्यास उर्वरित थकबाकी माफ करण्यात येणार आहे. ही योजना २०२४ पर्यंत चालणार असल्याची माहिती विद्युत वितरण कंपनीचे सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली.

दीड कोटीची वसुली

शहरात सक्तीने वीजबिल वसुली करण्यात येत असल्याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सक्तीने वीजबिल वसुली करत नसल्याचे सांगितले. तसेच वीज ग्राहकांकडून आजतागायत १ कोटी ६० लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता राजेश आंबेकर यांनी लोकमतला दिली.

Web Title: Forced recovery of electricity bills in cage from MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.