बिंदुसरा पात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST2021-07-27T04:34:59+5:302021-07-27T04:34:59+5:30

बीड : शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा पात्रानजीक अतिक्रमण व नियमाप्रमाणे राहणाऱ्या तब्बल ३०० घरांना महापुराचा धोका आहे. पालिकेकडून तर काहीच ...

Flood threat to 300 houses near Bindusara Patra | बिंदुसरा पात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका

बिंदुसरा पात्राशेजारील ३०० घरांना महापुराचा धोका

बीड : शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा पात्रानजीक अतिक्रमण व नियमाप्रमाणे राहणाऱ्या तब्बल ३०० घरांना महापुराचा धोका आहे. पालिकेकडून तर काहीच उपाययोजना केल्या जात नाहीत. तसेच पात्र अस्वच्छ असल्याने पुराचे पाणी शहरात घुसण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी असे एक वेळा झाल्याने मोठी हानी झालेली आहे. आता पुन्हा पालिका महापुराची वाट पाहतेय का, असा सवाल उपस्थित होत आहे.

राज्यात कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये महापुराने हाहाकार माजला आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून, जीवितहानीसह वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळून निष्पाप लोकांचा जीवही गेला आहे. प्रशासनाने अगोदर उपाययोजना करण्याचे सोडून, नंतर धाव घेत सांत्वन करण्याचा आव आणत आहे. असाच काहीसा प्रकार बीड शहरातही आहे. शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा पात्रात सध्या सर्वत्र अस्वच्छता आहे. त्यातच पात्रात अतिक्रमण झाले असून, काही लोक या ठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे नदीला पूर आल्यास जवळपास ३०० घरांना याचा धोका पोहोचण्याची दाट शक्यता आहे. अर्धा पावसाळा झाला तरी अद्यापही पालिकेकडून या लोकांचे स्थलांतर करून पात्र स्वच्छ केलेले नसल्याने संताप व्यक्त होत आहे. हानी झाल्यावर पालिकेला जाग येणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

दीड वर्षांपूर्वी पात्राची स्वच्छता

सध्या नदीपात्रात बाभळीची मोठमोठी झाडे उगावली आहेत. तसेच शहरातील कचराही पात्रातच टाकला जातो. काहींनी व्यवसाय थाटले आहेत. यामुळे पात्र अरुंद व अस्वच्छ झाले आहे. या झाडांना अडून पाणी शहरात घुसण्याची दाट शक्यता आहे. पालिकेने दीड वर्षापूर्वी पात्र स्वच्छ केल्याचा दावा केला असला तरी सद्यस्थिती भयावह आहे.

---

विरोधक अन् सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्षच

एरव्ही नाल्यांमधील अस्वच्छतेवरून बीड पालिकेत सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करतात. स्वच्छता करून फोटोसेशन करून चमकोगिरीही केली जाते. परंतु, या गंभीर प्रश्नाकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.

---

साधारण दीड वर्षापूर्वी पात्राची स्वच्छता केली होती. पात्रालगत बहुतांश लोकांनी अतिक्रमण केले असून, त्यांना नोटिसाही दिल्या आहेत. हे लोक अतिक्रमित असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नच येत नाही. त्यांनीच सुरक्षितस्थळी राहणे आवश्यक आहे, तरीही आणखी एक वेळा सर्वेक्षण केले जाईल.

डॉ. उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद, बीड

---

या भागात जास्त धोका

मोमिनपुरा, खासबाग, जुना मोंढा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पेठबीड

--

एवढ्या लोकांचे झाले सर्वेक्षण - २५५

स्थलांतरित लोकांची संख्या - ००

260721\26_2_bed_8_26072021_14.jpeg

बीड शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदी पात्रात अशाप्रकारे बाभळी उगावल्या आहेत. त्यामुळे पात्र अरूंद झाले आहे. याच झाडांना अडून पाणी शहरात शिरण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: Flood threat to 300 houses near Bindusara Patra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.