नियमबाह्य पैसे उचलणाऱ्यांकडून पाच लाखांची तालुक्यात वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:31 IST2021-03-08T04:31:01+5:302021-03-08T04:31:01+5:30
अनिल महाजन धारूर : पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने देशात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू ...

नियमबाह्य पैसे उचलणाऱ्यांकडून पाच लाखांची तालुक्यात वसुली
अनिल महाजन
धारूर : पंतप्रधान किसान योजनेद्वारे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी केंद्र शासनाने देशात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आहे. यामध्ये शेतकरी नसणाऱ्यांनीही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत डल्ला मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने अशा बोगस शेतकऱ्यांकडून लाभ घेतलेला निधी वसूल करण्यात येत आहे.
यामध्ये धारुर तालुक्यातील ५४५ आयकर भरणाऱ्या नागरिकांना पीएम किसान योजनेवर पाणी सोडावे लागणार आहे, तर एकाच कुटुंबात अनेकांना लाभ मिळत असल्याने तालुक्यातीलच ३२८२ जणांना या योजनेचा यापुढे लाभ घेता येणार नाही. आजपर्यंत घेतलेला निधी परत करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून नोटीस देण्यात येत आहे. पाच लाखाची वसुली आतापर्यंत झाली आहे. तसेच यापुढे पती किंवा पत्नी दोघांतून एकाच व्यक्तीस पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
देशातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांपर्यंतचा लाभ देत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वकांक्षी पीएम किसान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला आहे; परंतु या योजनेचा दुरूपयोग करत जमीन नसणाऱ्यांनी या योजनेवर डल्ला मारत लाभ पदरात पाडून घेतला आहे. तसेच आयकर भरणाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून पीएम किसान योजनेचा घेतलेला लाभ परत करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत. धारूर तालुक्यातील ५४५ आयकर भरणारे नागरिक या योजनेचा लाभ घेत होते, तर एकाच कुटुंबात अनेकजण या पद्धतीने ३२८२ नागरिक या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने या सर्वांना तहसील प्रशासनाच्या वतीने मागील आठवडाभरापासून नोटीस पाठवण्यात येत आहे.
एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेणे अपेक्षित असताना पती आणि पत्नी यांच्यासह मुलांच्या नावेही या योजनेचा लाभ घेण्यात येत होता. त्यामुळे वरील सर्वांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांच्याकडून पीएम किसान योजनेचा लाभ घेतलेला लाभ वसूल केला जात आहे. महसूल प्रशासनाच्या सांगण्यानुसार यापुढे पती किंवा पत्नी दोघातून एकाच व्यक्तीस कायदेशीररीत्या पीएम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे तर पती किंवा पत्नीच्या पश्चात दुसऱ्या व्यक्तीस वारसा पत्राने त्या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यामुळे यापुढे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीने पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा, तर कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीने या लाभावर पाणी सोडावे लागणार आहे.
आठवडाभरात पाच लाखांची वसुली
आयकर भरणाऱ्या तसेच एका कुटुंबात अनेकजण पीएम किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्वांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी आठवडाभरात साधारण पाच लाख रुपयापर्यंत निधी परतावा केला आहे. सर्वांनी महसूल प्रशासनास सहकार्य करत शासनाची फसवणूक करून उचललेला पैसा तात्काळ जमा करावा अन्यथा पुढे होणाऱ्या कारवाईस ते स्वतः जबाबदार असतील, असे महसूल विभागाचे नायब तहसीलदार प्रकाश गोपड यांनी सांगितले.