कोराेनाबाधित महिलेवर म्युकरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:11+5:302021-06-20T04:23:11+5:30
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया (दुर्बिणीद्वारे) शनिवारी दुपारी यशस्वी पार पडली. यापूर्वी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात ...

कोराेनाबाधित महिलेवर म्युकरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया
बीड : येथील जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया (दुर्बिणीद्वारे) शनिवारी दुपारी यशस्वी पार पडली. यापूर्वी अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात म्युकरमायकोसिसवर शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. विशेष म्हणजे शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचा दोन दिवसांपूर्वीच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
वडवणी तालुक्यातील ६५ वर्षीय महिला १४ एप्रिल रोजी कोरोनाबाधित आढळल्याने लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात दाखल झाली. १५ दिवस उपचार घेत कोरोनामुक्त होऊन घरी परतली. परंतु मागील आठवडाभरापासून तिला नाकात कोंदणे, दात दुखणे, गालावर सुज येणे असा त्रास सुरू झाल्याने ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. तिचा सीटी स्कॅन केला असता म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसली. त्यामुळे तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी तिची अँटिजन चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. परंतु तरीही शनिवारी दुपारी या महिलेला शस्त्रक्रिया गृहात घेण्यात आले. सुरुवातीला इन्डोस्कोपीक सायनस डिब्राईडमेंट ही शस्त्रक्रिया सुरू केली. परंतु तरीही संसर्ग जास्त असल्याने आणखी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. बीडमध्येच शस्त्रक्रिया आणि उपचार मिळत असल्याने सामान्यांना दिलासा मिळत आहे.
---
या टीमने घेतले परिश्रम
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.अशोक हुबेकर, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सचिन कोल्हे, डॉ.सुधाकर बीडकर, डॉ.अभिषेक जाधव, डॉ.मीनाक्षी साळुंके, डॉ.साेमनाथ वाघमारे, परिसेविका जयश्री उबाळे, वैशाली सपकाळ, अधिपरिचारिका मिता लांबोरे, महेंद्र भिसे, वर्षा कुलकर्णी, कक्षसेवक संदीप बामने, राजेश क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले. यावेळी डॉ.सचिन आंधळकर, डॉ.महेश माने, डॉ.रामेश्वर आवाड यांचीही उपस्थिती होती. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या डॉ.उज्ज्वला गावडे, संदीप राऊत, बाळासाहेब खळगे यांनीही शस्त्रक्रियेसाठी नियोजन केले.
===Photopath===
190621\19_2_bed_12_19062021_14.jpeg
===Caption===
जिल्हा रूग्णालयात कोरोनाबाधित महिलेवर दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांचे पथक दिसत आहे. सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे, डाॅ.अशोक हुबेकर आदी.