मुलांच्या स्वागताविना शाळेचा पहिला दिवस..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:46+5:302021-06-18T04:23:46+5:30
अंबाजोगाई : सलग दुसऱ्या वर्षी शाळा बंद असल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसाची मजा हरवलेली पाहायला मिळाली. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट ...

मुलांच्या स्वागताविना शाळेचा पहिला दिवस..
अंबाजोगाई : सलग दुसऱ्या वर्षी शाळा बंद असल्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसाची मजा हरवलेली पाहायला मिळाली. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आल्यामुळे शाळा बंद राहिल्या. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मुलांनी वर्षभर शाळेचा परिसरदेखील पाहिला नाही. सगळेच वर्ग बंद असल्यामुळे गेल्या वर्षी पहिलीत दाखल झालेल्या मुलांनी शाळादेखील पाहिलेली नाही.
केवळ नाव दाखल झाले. पुस्तके मिळाली. ऑनलाइन शिक्षक दिसले. भाषा, इंग्रजी, गणित यांसारखे पुस्तके असलेले विषय थोडेफार समजले. पण शारीरिक शिक्षण कार्यानुभव, कला या विषयांची ओळखदेखील झाली नसल्याने मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास थांबला असल्याचे पालक बोलत आहेत. शाळेचे तोंड पाहिले नाही, तरी मुले दुसरीत गेली.
शाळा बंद असली तरी शिक्षण सुरू आहे. शिक्षक ऑनलाइन ऑफलाइन गृहभेटी, या विविध संकल्पनांमधून मुलापर्यंत शैक्षणिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असले तरी विद्यार्थ्यांविना शाळा, हे चित्र पाहवत नाही. नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करताना जो आनंद राहायचा. तो मिळाला नाही.
शाळेचा पहिला दिवस म्हटला की, खूप मजा असायची, नवीन वर्ग, नवीन पुस्तके, नवीन गणवेश, सर्व कसे नवनवीन असायचे. दोन वर्षांपासून ही सगळी नवलाई हरवत चालली आहे. केवळ ऑनलाइन शिक्षण घेऊन शालेय जीवन यांत्रिक झाले आहे. शारीरिक शिक्षण, कार्यानुभव, कला या विषयांची प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची गरज असते, ते मोबाइलद्वारे शक्य नाही, अशी अनेक पालकांची तक्रार आहे.
केवळ वर्गाने मुले पुढे जातील; पण प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभती मिळाली नाही. शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा हेच खरे नाते दृढ झालेले आहे.
पहिलीतील मुलांना ऑनलाइन शिक्षण किती समजणार?
ग्रामीण भागात आई-वडील शेतीकाम, मजुरीत व्यस्त असतात. त्यामुळे त्यांना कोणताही अभ्यास घेता येत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या समस्या भेडसावत आहेत.