सिंदफना प्रकल्पातून पहिले आवर्तन, रबीला ठरणार आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:59+5:302021-01-13T05:27:59+5:30
शिरूर कासार : सिंदफना मध्यम प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. मात्र, कालव्याच्या अर्धवट दुरुस्तीमुळे काही ...

सिंदफना प्रकल्पातून पहिले आवर्तन, रबीला ठरणार आधार
शिरूर कासार : सिंदफना मध्यम प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन शनिवारी सोडण्यात आले. मात्र, कालव्याच्या अर्धवट दुरुस्तीमुळे काही शेतकरी पाटाच्या पाण्यापासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.
यावर्षी सिंदफना मध्यम प्रकल्प ओसंडून वाहिला. शेतीसाठी पूर्ण हंगाम पाणी मिळेल अशी खात्री वाटत होती. मात्र, कालव्याच्या दुरुस्तीस विलंब झाला आणि आता पहिले आवर्तन सोडण्यात आले. यावेळी शाखा अभियंता अविनाश मिसाळ,पाखरे ,सरपंच सुदाम काकडे, हनुमान केदारसह तुपे नवनाथ यवले,बापुराव साळवे, लक्ष्मण काकडे ,सुरेश पवार आदी शेतकरी उपस्थित होते.
१५ ऑक्टोबर ते २८ फेब्रुवारी हा कालावधी रबी हंगामाचा मानला जातो. याकाळात किमान चार ते पाचवेळा पाणी सोडले जाते. यावर्षी मात्र पहिले आवर्तन सोडण्यास ९ जानेवारी उजाडले. आता असातसा दीड महिना उरला आहे. तांत्रिक अडचणी आणि मनुष्यबळाचा अभाव सांगितला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे. दुरुस्तीचे काम बीड -पाथर्डी रोडपर्यंतच झाल्याने काही शेतकरी पाटपाण्यापासून वंचित राहणार असल्याचे दिसत आहे.
दुरुस्तीस विलंब झाला. त्यासाठी मशिनरी उपलब्ध झाली नाही. तरीदेखील शेतीला पाणी सोडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळावर काम केले व पाणी सोडले आहे. शेतकऱ्यांनी पाणी वाया घालू नये तसेच पाणीअर्ज व पाणीपट्टीची बाकी भरावी, असे आवाहन शाखा अभियंता अविनाश मिसाळ व पाखरे यांनी केले आहे.