बीडमध्ये मोंढा भागात किराणा दुकानाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST2021-07-26T04:30:32+5:302021-07-26T04:30:32+5:30
जुना मोंढा भागात अशोक मनोहर शेटे नामक होलसेल किराणा दुकानातून रात्री ११ वाजेच्या सुमारास धूर येत असल्याचे परिसरातील लोकांनी ...

बीडमध्ये मोंढा भागात किराणा दुकानाला आग
जुना मोंढा भागात अशोक मनोहर शेटे नामक होलसेल किराणा दुकानातून रात्री ११ वाजेच्या सुमारास धूर येत असल्याचे परिसरातील लोकांनी पाहिले. त्यानंतर संबंधितांना कल्पना देण्यात आली. भारत शेटे यांनी तत्काळ दुकानाकडे धाव घेतली व आगीमुळे तापलेले शटर शटर उघडले. त्यावेळी दुकानात मोठ्या प्रमाणात आग पसरली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागून दुकानातील एसीचा स्फोट झाला. त्याचबरोबर दुकानातील माचिसच्या बॉक्सने पेट घेतल्याने आग भडकत होती. नगर परिषद आणि बाजार समितीच्या अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आग शमविण्यासाठी परिसरातील नागरिक, व्यापारी प्रयत्न करीत होते. परिसरातील वीजपुरवठा घटनास्थळापासून तोडण्यात आला होता.
मोठे नुकसान
सूचनेनंतर अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर आग शमविण्याचे काम सुरू झाले, मात्र अंधारामुळे अडथळे येत होते. त्यानंतर जनरेटर आणून त्याद्वारे फोकसच्या उजेडात आगीवर नियंत्रणाचे प्रयत्न सुरू झाले. पहाटे चार वाजेच्या सुमारास आग नियंत्रणात आली. दुकानात पसरलेल्या आगीत गोडेतेल, सुकामेवा, सर्व किराणा, काम्प्युटर कॅबिन, फर्निचर आदी काही तासात भस्मसात झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले.