बीड जिल्हा बँक उमेदवारांची अंतिम यादी आज लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST2021-02-24T04:34:48+5:302021-02-24T04:34:48+5:30
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सेवा साेसायटी मतदारसंघातून सर्व उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले ...

बीड जिल्हा बँक उमेदवारांची अंतिम यादी आज लागणार
बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीमध्ये सेवा साेसायटी मतदारसंघातून सर्व उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले असलेतरी सर्वच मतदारसंघातील राखीव ठेवलेल्या अर्जांवर निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर विधिग्राह्य नामनिर्देशनपत्रातील उमेदवारांची यादी बुधवारी दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत दाखल २१४ अर्जांवरील छाननीप्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. राखीव अर्जांवरही निर्णय सकाळपर्यंत अपेक्षित आहे. राखीव अर्ज ठेवलेल्या उमेदवारांना पुरावे दाखल करण्यासाठी निर्धारित अवधी देण्यात आला होता. सेवा संस्थांचे लेखापरीक्षण वर्ग अ आणि ब या मुद्यावरून सर्वच उमेदवारांची अडचण झाली. मात्र याबाबत वाद असून, गुणवत्तेवर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे, तर नागरी बँक, पतसंस्था मतदारसंघात विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांच्यासह राजकिशोर मोदी, संगीता अशोक लोढा ,दीपक घुमरे आदी ११ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत, तर पणन संस्था मतदारसंघात भाऊसाहेब नाटकर, आसाराम मराठे, जगदीश काळे, रामदास खाडे यांच्यासह सहा उमेदवार पात्र ठरल्याचे सांगण्यात येते.
विमुक्त जाती मतदारसंघातून तीन अर्ज पात्र ठरल्याने निवडणूक होण्याची शक्यता आहे, तर अनुसूचित जाती आणि ओबीसी मतदारसंघात प्रत्येकी एकच अर्ज वैध ठरला आहे. या दोन्ही मतदारसंघातील निर्णयासाठी राखीव ठेवलेले अर्ज पात्र झाले नाहीत तर संबंधित उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती मतदारसंघातून रवींद्र दळवी यांचा एकच अर्ज पात्र ठरला. तर तब्बल पाच अर्जांवरील निकाल राखीव ठेवला आहे. इतर ओबीसी मतदारसंघातून रंगनाथ धोंडे यांचा एकमेव अर्ज पात्र ठरला असून आखाडे यांच्या अर्जावरचा निर्णय राखीव ठेवला आहे. विमुक्त जाती मतदारसंघातून तीन अर्ज पात्र ठरले आहेत. यात महादेव तोंडे ,चंद्रकांत सानप, सत्यसेन मिसाळ यांचा समावेश असून, अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच परिस्थिती स्पष्ट होणार आहे.
----
तर होऊ शकते प्रशासकाची शिफारस
सेवा सोसायटी मतदारसंघातून एकही उमेदवार नसेल तर गणपूर्ती होणार नाही. १९ पैकी ११ संचालक सेवा सोसायटी मतदारसंघातील असतात. मात्र १९ पैकी ११ जण नसतील तर एकूण गणपूर्ती अभावी अडचणी येणार आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक अधिकाऱ्यांकडून राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला व सहकार विभागाला परिस्थिती कळविली जाणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडे बँकेवर प्रशासकीय मंडळाची शिफारस होऊ शकते.
-------
पात्र उमेदवारांनाही धसका
राज्य सहकार प्राधिकरणाच्या आदेशानुसार ही निवडणूक होत आहे. सेवा सोसायटी मतदारसंघाचा पेच आहे, तर सतर मतदारसंघातून निवडून आलेल्या उमेदवारांची संचालक मंडळाच्या संख्येनुसार गणपूर्ती होणार नाही, त्यामुळे निवडून आलेल्यांचे मंडळ सहकार कायद्यानुसार अपात्र ठरतील, अशी तरतूद असल्याची चर्चा ऐकायला मिळाली. जर अपात्र ठरल्यास त्यांना पुढील दोन टर्म निवडणूक लढविता येणार नसल्याची चर्चाही रंगली होती. त्यामुळे सेवा सोसायटी मतदारसंघातील उमेदवारांसोबतच पात्र उमेदवार धोक्यात येऊ शकतात, त्यामुळे त्यांनीही धसका घेतल्याचे बोलले जात होते.
--------
ही तर राजकीय खेळी
सोसायट्यांचा लेखापरीक्षण दर्जा अ व ब आवश्यक असल्याच्या मुद्द्यावरून उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरल्याचे वृत्त समजल्यानंतर राजकीय लाभ-नुकसानीच्या चर्चेने जोर धरला, तर सेवा सोसायटीच्या ऑडिट दर्जावरून निवडणूक लढविण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. सत्ताधाऱ्यांना आपली सत्ता जिल्हा बँकेवर येणार नाही, अशी भीती असल्याने निवडणुकीला सामोरे न जाता निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून उमेदवारांचे अर्ज बाद केले आहेत. मर्जीतला प्रशासक आणण्याची खेळी सुरू असून, याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले.
-----