चौसाळा गावातील खड्डे बुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:50 IST2021-01-08T05:50:32+5:302021-01-08T05:50:32+5:30
बसथांबा करण्याची मागणी बीड : वडवणी ते तेलगाव या महामार्गावर पुसरा फाटा येथे प्रवाशांसाठी गत दोन वर्षांपूर्वी बस थांबा ...

चौसाळा गावातील खड्डे बुजवा
बसथांबा करण्याची मागणी
बीड : वडवणी ते तेलगाव या महामार्गावर पुसरा फाटा येथे प्रवाशांसाठी गत दोन वर्षांपूर्वी बस थांबा करण्यात आला होता; परंतु चालकांनी सुरुवातीचे दिवस वगळले तर नंतर या ठिकाणी बसेस थांबविणे बंद केले. त्यामुळे पुसरा, चिंचाळा, तिगाव, मोरवड, हिवरगव्हाण या गावातील प्रवाशांना वडवणी, तेलगावला जावे लागते.
बोंडअळी वाढली
बीड : जिल्ह्यात कापूस वेचणीस सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बोंडअळी व्यवस्थापन करण्याचे आव्हान कृषी विभाग व शेतकऱ्यांसमोर उभे आहे. अवकाळी पाऊस व बोंडअळीमुळे पूर्वीच नुकसान झाले. यासाठी मार्गदर्शनाची मागणी होत आहे.
पांदण रस्त्याची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने यामध्ये लक्ष घालून रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतागृहातील अस्वच्छतेने दुर्गंधी
बीड : शहरातील क्रीडा संकुल भागात लघुशंकेसाठी उभारण्यात आलेले स्वच्छतागृह अस्वच्छ असल्याचे दिसत आहे. नगरपालिकेने या ठिकाणी नियमित पाणी टाकून स्वच्छता करणे गरजेचे आहे. वेळच्या वेळी स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मद्यपींचा वावर
रायमोहा : शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा परिसरात सध्या अवैध दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींचा वावर वाढला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी हे मद्यपी पडलेले दिसतात. लहान मुले व महिलांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दारू विक्री बंद करण्याची मागणी होत आहे.