पहिले पाढे पंचावन्न; नोटीस बजावूनही कर्मचारी पुन्हा गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:23 IST2021-06-17T04:23:42+5:302021-06-17T04:23:42+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे नियोजन करणारे कर्मचारी घरीच बसून कारभार हाकत असल्याचे 'लोकमत'ने समोर आणले होते. यावर संबंधितांना ...

पहिले पाढे पंचावन्न; नोटीस बजावूनही कर्मचारी पुन्हा गायब
बीड : जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचे नियोजन करणारे कर्मचारी घरीच बसून कारभार हाकत असल्याचे 'लोकमत'ने समोर आणले होते. यावर संबंधितांना नोटीस बजावल्या होत्या. याला २४ तास उलटत नाही तोच दुसऱ्या कर्मचाऱ्यांनी पहिले पाढे पंचावन्न केले. कर्मचारी तासभर काम करून गायब झाले होते. विशेष म्हणजे प्रमुखही घरीच होते. फोनाफोनी झाल्यार सर्वांची धावपळ झाली.
जिल्हा रुग्णालयात नूतन जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ. सुरेश साबळे रुजू झाले. इतर यंत्रणा कामचुकारपणा करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कोरोना वॉर्डमधील ऑक्सिजन खाटांचे नियोजन करण्यासाठी २० अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले. त्यांनी ऑक्सिजन, बायपॅप, व्हेंटिलेटरबाबत सर्व अडचणी वॉर्डात उपस्थित राहून दूर करायच्या आहेत. परंतु, हे लोक फोनवरून अथवा तासभर राऊंड घेऊन गायब होत असल्याचे रविवारीच उघड झाले होते, तर काही कर्मचारी घरीच होते. याबाबत 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच डॉ. साबळे यांच्या सूचनेवरून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावल्या होत्या. याला २४ तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या पथकाने त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचे दिसले.
दरम्यान, अधिकाऱ्यांनी याबाबत पथक प्रमुख डॉ. सचिन वारे यांना संपर्क केला. यावर ते स्वत:च घरी होते. येथील कर्मचाऱ्यांनी चार आकडे लिहून व्हाॅट्सॲपवरून त्यांना अहवाल सादर केला आणि निघून गेले. वास्तविक पाहता त्यांनी सहा तास रुग्णालय अथवा परिसरात थांबणे आवश्यक आहे. परंतु, हे सर्वच गायब होते. अधिकाऱ्यांनी संपर्क केल्यावर डॉ. वारे यांच्यासह कर्मचारी धावत आले. यावरून कामचुकारांमध्ये सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, या पथकाने महत्त्वपूर्ण कामात हलगर्जी केल्याचे उघड झाल्यास त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा, शिस्तभंग तसेच फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामान्यांमधून होत आहे.
सीसीटीव्हीमध्ये प्रकार कैद
कर्मचाऱ्यांनी खुलासा देताना आपण इथेच असल्याचे सांगितले. परंतु, ते इथे होते की नाही, हे सीसीटीव्ही पाहिल्यावर समजणार आहे. ते आले कधी आणि गेले कधी, हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा खोटारडेपणा कॅमेरा तपासणीनंतर समोर येणार आहे.
---
कर्मचाऱ्यांनी ड्युटीच्या वेळेत रुग्णालयातच थांबणे बंधनकारक आहे. त्यांनी हजर असल्याचे सांगितले आहे. तरीही गुरुवारी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील. यात अधिकारी, कर्मचारी खोटे बोलल्याचे उघड झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
--
मी सर्वच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले होते. त्यांनी दोन वेळेचा अहवाल सादर केला. आपण कोठेच गेले नसल्याचे त्यांनी माझ्यासमोर कबुल केले आहे. यात त्यांनी काही लपविल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल.
डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड