ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:35 IST2021-04-04T04:35:00+5:302021-04-04T04:35:00+5:30
वृक्ष संवर्धनाची गरज अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात पठाण मांडवा परिसरात असलेल्या वन विभागाच्या जंगलात अचानक आग लागली. या आगीत ...

ग्रामीण भागात कोरोनाची धास्ती
वृक्ष संवर्धनाची गरज
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात पठाण मांडवा परिसरात असलेल्या वन विभागाच्या जंगलात अचानक आग लागली. या आगीत अनेक वृक्ष संपदा जळून खाक झाल्या. डोंगरावर मोठ्या प्रमाणात विविध प्रकारचे वृक्ष होते. यात सीताफळांच्या झाडांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. अचानक लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वृक्षांची हानी झाली. आता आगामी काळात या परिसरात वृक्षसंवर्धन करणे हे वन विभागासमोर मोठे आव्हान आहे. या कामी सामाजिक संस्थांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी वृक्षमित्र हेमंत धानोरकर यांनी केली आहे.
भितींचे विद्रुपीकरण थांबवा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात असणा-या विविध शासकीय कार्यालये, विविध संस्था, शाळा यांच्या संरक्षक भिंतीवर विविध क्लासेस व विविध कंपन्यांच्या वतीने संरक्षक भिंती रंगवून या भिंतीचा वापर जाहिरातबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. अशा प्रकारच्या जाहिराती करण्यास निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. चांगल्या भिंतीचे विद्रुपीकरण करण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा
अंबाजोगाई : गेल्या काही महिन्यात अंबाजोगाई तालुक्यात व शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहनचालक आपले वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करत नाहीत. तसेच अनेक युवक शहरातही गर्दीच्या ठिकाणी सुसाट वेगाने वाहन चालवतात. परिणामी अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. शासनाने हेल्मेटचा वापर सक्तीचा करूनही अनेक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करत नाहीत. त्यामुळे अपघात झाल्यास मोठ्या आजाराचा सामना करावा लागतो. यासाठी हेल्मेटला प्राधान्य द्या, अशे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रवी मठपती यांनी केले आहे.
काकडीला मागणी वाढली
अंबाजोगाई : उन्हाळ्यात आहारामध्ये काकडीला महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. शरीराला थंडावा मिळत असल्याने काकडीचा वापर करण्याकडे गृहिणींचा मोठा कल असतो. सध्या बाजारात काकडीची आवकही मोठ्या प्रमाणात असल्याने काकडी २० ते २५ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. शहरवासीयांमध्ये काकडी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा मोठा कल असल्याचे समोर आले आहे.