काटकोन वळणावर अपघातात पितापुत्र गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:30 IST2021-03-07T04:30:45+5:302021-03-07T04:30:45+5:30
कडा : कडा -धामणगाव रोडवर सध्या शहराला लागूनच रेल्वेचे काम सुरू असल्याने दैनंदिन वाहतुकीचा रस्ता बंद करून पर्यायी ...

काटकोन वळणावर अपघातात पितापुत्र गंभीर जखमी
कडा : कडा -धामणगाव रोडवर सध्या शहराला लागूनच रेल्वेचे काम सुरू असल्याने दैनंदिन वाहतुकीचा रस्ता बंद करून पर्यायी रस्ता काढला आहे. पण हा काटकोनात काढलेला रस्ता धोक्याचे वळण लक्षात येत नसल्याने शुक्रवारी रात्री औरंगाबादवरून कड्याकडे येत असलेल्या दुचाकी चालकाला लक्षात न आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील पितापुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
आष्टी तालुक्यातील कडा शहराला लागून नगर-बीड -परळी रेल्वेचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता केला असला तरी पहिला खोदलेला रस्ता असल्याने व तिथे रात्रीच्या वेळी रेडियम किंवा लाईट नसल्याने लक्षात येत नसल्याने आजवर महिनाभरात पन्नासहून जास्त वाहनांचा अपघात झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेआठ नऊच्या सुमारास औरंगाबादकडून येणारी विनानंबरची दुचाकी समोरील भरावर जाऊन आदळली. जोरात झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाबासाहेब गायकवाड (२०) तर मुलगा विशाल बाबासाहेब गायकवाड (३) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारार्थ नगर येथे हलवले आहे. आष्टी पोलीस ठाण्यात अद्याप याप्रकरणी कसलीही नोंद करण्यात आली नव्हती.
टाहो फोडत लेकरूही बेशुद्ध
बेशुद्ध झालेल्या वडिलांजवळ रक्तबंबाळ लेकरू एक तास टाहो फोडत होते. लेकराच्या डोक्यालादेखील गंभीर मार लागला होता; पण बेशुद्ध झालेले वडील उठत नसल्याने रक्तबंबाळ झालेले लेकरू टाहो फोडताना पाहून लोक जमा झाले. यादरम्यान तेही बेशुद्ध झाल्याचे हृदयद्रावक चित्र येथे पहावयास मिळाले.