महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:34 IST2021-02-24T04:34:37+5:302021-02-24T04:34:37+5:30
गेवराई : महावितरणकडून शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजजोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे ...

महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या
गेवराई : महावितरणकडून शेतकऱ्यांची सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजजोडणी तोडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत मंगळवारी शिवसेना नेते माजीमंत्री बदामराव पंडित यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तोडलेली वीजजोडणी पूर्ववत करण्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला.
यावेळी अभियंता शिवणकर यांच्याशी चर्चा करून तत्काळ तोडगा निघत नसेल तर आपण याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचा पवित्रा बदामराव पंडित व उपस्थित शेतकऱ्यांनी घेतला होता. दुपारी २ वाजेपर्यंत यावर कुठलाच तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच ठाण मांडले होते. शेतकरी आणि अधिकाऱ्यांच्या चर्चेतून मार्ग निगत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू ठेवले होते. औरंगाबाद येथील संयुक्त व्यवस्थापकीय संचालकांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यानंतर बदामराव पंडित यांनी काही शेतकऱ्यांसह कार्यकारी अभियंता गाडे यांची बीड येथे जाऊन भेट घेतली. त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर विद्युत वितरण कंपनीने शेतकऱ्यांना ६ ऐवजी ८ तास वीजपुरवठा करावा आणि शेतकरी प्रति कनेक्शन पाच हजार रुपये बिल भरतील असे ठरले. त्यानंतर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
यावेळी बदामराव पंडित यांच्यासह माजी सभापती अभिजित पंडित, पंचायत समिती माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, शिवसेना पं. स. गटनेते बापू चव्हाण, शिवसेना तालुका उपप्रमुख दिनकर शिंदे, महादेव औटी, मुकुंद बाबर, बदाम पौळ, विश्वनाथ सोनवणे, माउली धुमाळ, अमोल वाकडे, सुनील वाकडे, कैलास वाकडे, मदन गवारे, विष्णू आंधळे, भागवत वडघणे, सुनील वडघणे, भीमराव कोठेकर आदींसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.