कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:26 IST2021-02-05T08:26:18+5:302021-02-05T08:26:18+5:30
आंदोलनस्थळी स्वच्छतेची मागणी बीड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या आंदोलनस्थळावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी विविध समस्या, मागण्या ...

कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित
आंदोलनस्थळी स्वच्छतेची मागणी
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या आंदोलनस्थळावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी विविध समस्या, मागण्या घेऊन नागरिक आंदोलन करतात. विविध उपोषणेदेखील कित्येक दिवस या ठिकाणी चालतात. मात्र या परिसरावर घाण असल्यामुळे दुर्गंधी येते. आंदोलनकर्त्यांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो. हा परिसर स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगारनिर्मिती उपलब्ध होणार नाही. शेतीतील कामेही संपुष्टात आल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. अशा स्थितीत शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून गाव रस्ते, शिव रस्ते यांची कामे सुरू केली तर शेतमजुरांना गावातच काम उपलब्ध होईल, यासाठी रोहयो कामाची मागणी आहे.
रेशन दुकानांमध्ये दरपत्रकाचा अभाव
अंबाजोगाई : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनी भागात अनेक दुकानदारांनी धान्याचे दरपत्रक लावलेले नाहीत. तसेच अनेक दुकानांमध्ये तक्रारपेटीदेखील ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे रेशन धान्याचा उपलब्ध साठा व शासकीय किमती याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत नाही. रेशन दुकानदारांनी दरपत्रकाचा फलक लावावा, अशी मागणी आहे.
गटारी तुंबल्या
नेकनूर : नेकनूर हे आठवडी बाजाराचे मोठे गाव आहे. मात्र गावातील गटारी तुंबल्यामुळे गावकऱ्यांसह बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गटारी साफ करण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष आहे.
वीज मिळेना
बीड : रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू यासह इतर पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. यामुळे शेतकरी विद्युतपंपाच्या माध्यमातून पाणी देत आहेत. वेळेवर व सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे पाणी देण्यास अडचणी येत आहेत.