पुण्यातील हलवायांना विकली जात होती बनावट खव्याची मिठाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:10 IST2019-06-15T00:09:14+5:302019-06-15T00:10:11+5:30
तालुक्यातील उमरीफाटा येथील बनावट खवा बनविणाऱ्या विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बनावट खव्यासाठी वापरण्यात येणारे ९ लाख ६६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून डेअरी सीलबंद केली आहे.

पुण्यातील हलवायांना विकली जात होती बनावट खव्याची मिठाई
केज : तालुक्यातील उमरीफाटा येथील बनावट खवा बनविणाऱ्या विशाल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून बनावट खव्यासाठी वापरण्यात येणारे ९ लाख ६६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून डेअरी सीलबंद केली आहे. या डेअरीतील खव्यापासून बर्फी बनवून ती पुण्यासह इतर ठिकाणच्या हलवायांना विकली जात होती, असे चौकशीत पुढे आले असून सर्व नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळणाºया या डेअरीवरील कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
केज तालुक्यातील उमरीफाटा येथील विशाल डेअरी येथे बनावट खवा बनविला जात असल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन बीडचे सहाय्यक आयुक्त श्रीकृष्ण दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व ऋषिकेश मरेवार यांनी गुरुवारी विशाल डेअरीवर छापा टाकून कारवाई केली.
डेअरीत रत्ना गोल्ड वनस्पती, समर्थ रिफाइन्ड सोयाबीन तेल, साखर व दुध पावडर यांचे मिश्रण तयार करून बनावट खवा उत्पादन केले जात होते. अशा बनावट खव्यापासून संस्कार ब्रँड बर्फी तयार करून ती आकर्षक पॅकिंग करून पुणे व सतर ठिकाणच्या स्वीटमार्ट दुकानांना विक्री केली जात असल्याचे चौकशीत आढळून आले.
अन्न व औषध प्रशासन विभागाची ही कारवाई गुरुवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत सुरु होती. घेतलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी होणार आहे.
परवानगीआड गोरखधंदा
सदरील विशाल डेअरीने अन्न व औषध प्रशासन बीड कार्यालयातून केवळ दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन करण्याचा परवाना घेतला आहे. प्रत्यक्षात मात्र येथे दुधापासून खवा न बनविता रत्ना गोल्ड वनस्पती, समर्थ रिफाइन्ड सोयाबीन तेल, साखर व दुध पावडर यांचे मिश्रण तयार करून बनावट खवा उत्पादन केले जात होते.