केज : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली सध्या बीड जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड याने १० जुलै रोजी भ्रमणध्वनीवरून कोणाकोणाला संपर्क साधला याची चौकशी सीडीआर काढून दोषींविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मस्साजोग येथील धनंजय देशमुख यांनी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे केली आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागण्याच्या आरोपाखाली जिल्हा कारागृहात असलेल्या वाल्मीक कराड याचे फोटो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यकर्ते विविध बॅनरवर राजरोसपणे छापत आहेत. हा प्रकार आपण स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिला असतानाही हे प्रकार सर्रासपणे चालू आहेत. या प्रकरणाची चौकशी करून आरोपीचे फोटो छापणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्याची मागणी आपण उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.