केज (जि. बीड) - मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला २ कोटी रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी हे २९ नोव्हेंबरला २०२४ ला केज येथील विष्णू चाटे याच्या संपर्क कार्यालयात सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी एकत्रितपणे आत जाताना सीसीटीव्हीत दिसत आहेत. त्यापाठोपाठ ११ वाजून २७ मिनिटांना पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील त्याच कार्यालयात गेले, असे हे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाले आहे.
खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेले वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले या तिघांसह सरपंच देशमुख यांचे अपहरण करून त्यांच्या हत्येचा आरोप असलेले सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळेसह इतर एकत्रित या कार्यालयात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज म्हणजे वाल्मीक कराड टोळीच्या विरोधातील सर्वांत मोठा पुरावा मानला जात आहे.
सर्व आराेपींच्या साेबत पोलिस उपनिरीक्षक कशासाठी?विष्णू चाटेच्या कार्यालयात सर्व आरोपी हे ११ वाजून २५ मिनिटांना कार्यालयात जाताच त्यांच्या पाठोपाठ पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील हेदेखील ११:२७ मिनिटांना कार्यालयात जाताना व्हिडीओत दिसत आहेत.
त्याच दिवशी दीड कोटीची मालमत्ता खरेदी केज येथील अंबाजोगाई रोडवरील हंसराज देशमुख यांची इमारत वाइन शॉप चालविण्यासाठी वाल्मीक कराड याने १ कोटी ६९ लाख रुपयांना खरेदी केली होती. त्याची नोंदणीही २९ नोव्हेंबर रोजीच वाल्मीक कराडच्या नावावर झाली आहे.