मुदतबाह्य ‘ज्यूस’ रस्त्यावर !
By Admin | Updated: July 20, 2015 00:54 IST2015-07-20T00:23:22+5:302015-07-20T00:54:47+5:30
सोमनाथ खताळ , बीड हैदराबाद येथील एका कंपनीच्या ‘मँगो ज्यूस’चे मुदत संपलेले हजारांवर पाकीटे रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. खंडेश्वरी मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर टाकलेल्या या पाकीटांतील

मुदतबाह्य ‘ज्यूस’ रस्त्यावर !
सोमनाथ खताळ , बीड
हैदराबाद येथील एका कंपनीच्या ‘मँगो ज्यूस’चे मुदत संपलेले हजारांवर पाकीटे रस्त्यावर टाकण्यात आली आहेत. खंडेश्वरी मंदिर परिसरातील मुख्य रस्त्यावर टाकलेल्या या पाकीटांतील ज्यूस पोटात गेल्यास धोक निर्माण होण्याची भीती आहे. ‘लोकमत’ने नियमबाह्यपणे फेकलेली पाकीटे चित्रबद्ध केल्यावर औषध प्रशासन खडबडून जागे झाले.
मुदत संपलेले मँगो ज्यूस आजही शहरातील काही दुकानांमधून विकले जात असल्याचा संशय वाढला आहे. खंडेश्वरी मंदीर परिसरात आढळून आलेल्या ज्यूस पाकिटांपैकी काही फुटलेले होते तर काही बंद होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे ज्यूसची पाकीटे इतकी उघड्यावर आहेत की, तेथे मोकाट गुरे, डुकरे देखील सहज पोहोचू शकतात. त्यामुळे माणासांसोबतच मुक्या प्राण्यांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. रविवारी सुटी असल्याने नागरिक खंडेश्वरीच्या दर्शनाला जात होते. त्या सर्वांना नाकाला रुमाल लावल्याशिवास पुढे जाता येत नव्हते. ‘लोकमत’ ने ‘स्पॉट’ पंचनामा केल्यानंतर आता अन्न प्रशासनाने ही पाकीटे बीडमध्ये कोणाला दिले?, कोण विकत होते?, कोणी रस्त्यावर टाकले ? याचा शोध सुरु केला आहे.
रस्त्यावर आढळलेल्या मँगो ज्यूसच्या एका पाकिटाची किंमत दोन रूपये आहे. यामध्ये ५० मिली ज्यूस आहे. मँगो ज्यूस बनविल्याची तारीख १६ फेब्रुवारी २०१५ अशी असून निर्मिती केलेल्या तारखेपासून दोन महिने हे पॅकेट विक्री केले जावू शकतात. मात्र, अद्यापपर्यंत विक्री सुरुच होती, हे स्पष्ट झाले आहे.
कुठलीही मुदत संपलेली वस्तू अथवा पदार्थ अशाप्रकारे रस्त्यावर टाकणे नियमबाह्य आहे. त्याची मुदत सपंलेली असेल तर त्याची योग्य विल्हेवाट लावणे अथवा कंपणीला ते परत करणे गरजेचे असते, असे अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु येथे हा नियम पायदळी तुडवत राजरोसपणे पाकिटे रस्त्यावर फेकली.