मृत साठ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:35 IST2021-04-02T04:35:26+5:302021-04-02T04:35:26+5:30
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे धारूर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत या तलावात केवळ २७ ...

मृत साठ्यातील पाण्याचा बेसुमार उपसा
दिंद्रुड : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे धारूर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:स्थितीत या तलावात केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तलाव मृत साठ्यात गेले असताना शेतकरी बेसुमार उपसा करत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दिंद्रुडकरांना येत्या महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून दिंद्रुडची नोंद आहे. सुमारे १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या दिंद्रुडकरांना चाटगावच्या तलावातून पाणीपुरवठा होतो. या तलावात शेतकऱ्यांनी १५० ते २०० मोटारी टाकून शेतीसाठी बेसुमार उपसा सुरू केला आहे. दिंद्रुड ग्रामपंचायतीने तलावातील पाणी आरक्षित करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी धारूर तहसीलकडे मागणी केली आहे. मात्र, तहसीलकडून कुठलीही दखल अद्याप घेतलेली नाही. अवैधरीत्या पाणी उपसा तात्काळ थांबवला नाही तर दिंद्रुडकरांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.
आदेश नाही, सूचना नाही
यासंदर्भात लोकमतने पाटबंधारे विभागाकडे संपर्क साधला असता पिण्याचे पाणी आरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा कुठलाही आदेश आम्हाला मिळाला नाही. पालकमंत्र्यांची बैठक झाली नाही. यामुळे आम्ही शेतकऱ्यांना मोटारी काढण्याच्या सूचना देऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.
मंडळ अधिकाऱ्यांना निर्देश
धारूरच्या तहसीलदार व्ही. एस. शिडोळकर यांच्याशी संपर्क केला असता ग्रामपंचायत दिंद्रुडचे निवेदन मिळाल्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मंडळ अधिकारी यांच्याशी बोलून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
बेसुमार उपसा थांबवा
चाटगाव तळ्यातील चालू असलेल्या पाण्याच्या मोटारी बंद करत दिंद्रुडकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात यावे. या मागणीसाठी १५ दिवसांपूर्वी धारूर तहसीलला निवेदन दिले आहे. अद्याप तहसीलकडून कुठलीही कारवाई न झाल्याने तलावातील पाण्याचा बेसुमार उपसा होत आहे. आगामी काळात पाण्याचा दुष्काळ निर्माण झाल्यास धारूर प्रशासन जबाबदार असणार आहे. - अजय कोमटवार, सरपंच, दिंद्रुड
===Photopath===
010421\img-20210331-wa0130_14.jpg
===Caption===
चाटगाव येथील या तलावातून दिंद्रुडला पाणी पुरवठा होतो. मात्र मृत साठ्यात असलेल्या तलावातून बेसुमार उपसा सुरू आहे. तो थांबविण्याची मागणी होत आहे.