बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गतीने आणि योग्य पद्धतीने केल्याने गुन्हे अन्वेषण विभागातील २० अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशंसापत्र देण्यात आले आहे. पुण्याच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात मंगळवारी हा कौतुक सोहळा अपर पोलिस महासंचालक प्रकाश बुरडे यांच्या उपस्थित पार पडला. दरम्यान, २० जणांमध्ये पाच जण हे बीड कार्यालयातील आहेत.
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. यात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराडसह इतरांचा समावेश आढळल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले होते. घटनेनंतर तिसऱ्याच दिवशी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग केला. त्यानंतर खंडणी आणि मारहाणीचा गुन्हाही सीआयडीकडे वर्ग केला. बीड पोलिसांनी आराेपी पकडण्यात सीआयडीला मदत केली. सीआयडीने ८० दिवस तपास केला. त्यानंतर तिनही गुन्ह्यांचे एकत्रित जवळपास १ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यातील जबाब, फोटो आणि इतर काही गोष्टी बाहेर आल्यानंतर सीआयडीने किती गतीने आणि परफेक्ट तपास केला, हे समजले. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास करणाऱ्या प्रत्येकाचा कौतुक करण्याचे नियोजन अपर पोलिस महासंचालक प्रकाश बुरडे यांनी केले. त्याप्रमाणे मंगळवारी पुण्याच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्र्यांनीही केले स्वागतया गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीडचे पथक काम करत होते. इतर जिल्ह्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही मदत केली. सीआयडीने केलेल्या तपासाचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वागत केले.
यांचा झाला सन्मानमहानिरीक्षक सारंग आवाड, उपमहानिरीक्षक बसवराज तेली, अपर अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक अमोल गवळी, अनिल किसनगुजर, पोलिस सुभाषचिंधू मुठे, अक्षयकुमार ठिकणे, राजेंद्रकुमार पवार, मृगदीप गायकवाड, नीलेश नागवे, नागसेन सावळे, किरण घोंगडे, सहायक निरीक्षक प्रवीण भोसले, हवालदार योगेश नाईकनवरे, अमोल अंकुशराव बागलाने, शर्मिला साळुंके, दीपाली पवार, शिवानी कुमावत, कविता शिंदे, सिद्धेश्वर आमटे आदींचा सन्मान करण्यात आला. या सर्वांना रिवॉर्डही दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.