जून संपत आला तरी पेरण्या निम्म्यापेक्षा कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:22 IST2021-06-23T04:22:48+5:302021-06-23T04:22:48+5:30
शिरूर कासार : जून संपत आला असला तरी खरीप पेरणीने सरासरीचा निम्मा पल्लादेखील गाठला नसल्याचे तालुका कृषी कार्यालयाच्या नजर ...

जून संपत आला तरी पेरण्या निम्म्यापेक्षा कमीच
शिरूर कासार : जून संपत आला असला तरी खरीप पेरणीने सरासरीचा निम्मा पल्लादेखील गाठला नसल्याचे तालुका कृषी कार्यालयाच्या नजर अंदाजावरून दिसून येत आहे. याही वर्षी आतापर्यंत शेतकऱ्यांनी कापसालाच प्रथम पसंती दाखवली तर तूर दुसऱ्या क्रमांकावर असून सोयाबीन पेरा तिसऱ्या क्रमांकावर आहे. १७ जूनपर्यंत अवघा ६३ मिलीमीटर पाऊस झाल्याने पेरणी व लावणीचा वेग मंदावलेला आहे. आतापर्यंत २२,५४३ हेक्टर क्षेत्रात ४७ टक्के पेरणी झाल्याचा अंदाज आहे.
तालुक्यात सहा मंडळांतर्गत खरीप पेरणीलायक क्षेत्र ५३९७६.७४ हेक्टर इतके असून किमान ४७९०० हेक्टरवर सरासरी पेरणी होईल, असे अपेक्षित होते. आतापर्यंत झालेल्या पावसावर २२५४३ हेक्टरवर लागवड व पेरणी झाल्याचे दिसून येते. यंदा कापसापेक्षा सोयाबीन व तूर क्षेत्र वाढेल असे वाटत होते. मात्र सर्वाधिक पसंती कापूस लागवडीलाच दिसून आली. २२ हजार ५४३ हेक्टरपैकी १३ हजार ४८५ हेक्टरवर कापसाची लागवड झाली. दुसऱ्या क्रमांकाची पसंती तुरीला दिली गेली असून ३२४१ हेक्टर पेरा झाला आहे. बाजरीचा पेरा २९३४ हेक्टरवर तर सोयाबीन १३७६ हेक्टर क्षेत्रात पेरा झाला आहे. याशिवाय मका, मूग, भुईमूग, उडीद, कारळ, तीळ अशा वाणाची पहिल्या टप्प्यात पेरणी झाली असल्याचे सांगितले जाते.
ब्रह्मनाथ येळंब मंडळात पेरा कमी
ब्रह्मनाथ येळंब मंडळांतर्गत पेरा सर्वात कमी दिसून येतो तर सर्वाधिक पेरा हा तिंतरवणी त्यापाठोपाठ शिरूर, रायमोहा, गोमळवाडा, खालापुरी मंडळात झाला आहे. पुरेसा पाऊस झाल्यास खरिपाच्या क्षेत्रात वाढ होऊन सरासरीचा पल्ला गाठला जाईल, असे तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी सांगितले. जेमतेम ओलीवर पेरणी करू नये, मंडळ कृषी अधिकारी, कृषी साहाय्यक, कृषी पर्यवेक्षकासह कृषी कर्मचारी वेळोवेळी शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करत असल्याचे कृषी अधिकारी म्हणाले.
===Photopath===
220621\img20210621174651_14.jpg