नरेगात १७ लाखांचा अपहार; अभियंता, शिक्षकासह पोस्टमनवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST2021-09-18T04:37:17+5:302021-09-18T04:37:17+5:30
नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी यांच्या फिर्यादीनुसार, पट्टीवडगाव ते फावडेवाडी रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण काम महात्मा ...

नरेगात १७ लाखांचा अपहार; अभियंता, शिक्षकासह पोस्टमनवर गुन्हा
नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी यांच्या फिर्यादीनुसार, पट्टीवडगाव ते फावडेवाडी रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण काम महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत करण्याचा कार्यारंभ आदेश तहसीलदारांनी १२ जानेवारी, २०१५ रोजी काढला होता. तत्कालीन शाखा अभियंता एम.एस. चव्हाण याने चुकीचे अंदाजपत्रक तयार केले, तसेच रस्त्याचे कोणतेही काम न करता, त्याबाबत मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेतल्या व त्याबाबतचे बोगस देयके तयार करून शासनाची फसवणूक केली. या कामासाठी लाडझरी (ता.परळी) येथील शिक्षक दिनकर लव्हारे यास ठेकेदार दर्शविले, तसेच पट्टीवडगाव येथील पोस्टमन पंडित ज्ञानोबा पोकळे याने अभियंता चव्हाण आणि शिक्षक लव्हारे या दोघांसोबत संगनमत करून, मयत आणि इतर व्यक्तीच्या नावे बोगस खाते काढले व त्यांच्या नावे जमा झालेली अकुशल मजुरांची देयके परस्पर काढून घेत, सुमारे १७ लाख ८ हजार ४६८ रुपयांचा अपहार केला.
या रस्ता कामाबाबत तक्रारी झाल्या होत्या. हे प्रकरण तक्रार निवारण प्राधिकारी (रोहयो) यांच्या न्यायालयात चालले. न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रात तिन्ही आरोपींना दोषी ठरविण्यात आले. निकालपत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी अभियंता एम.एस. चव्हाण, शिक्षक दिनकर लव्हारे आणि पोस्टमन पंडित पोकळे या तिघांवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, १६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.