जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:41+5:302021-03-08T04:30:41+5:30
बीड : गेवराई तालुक्यातील मीरगांवचा बाजार करून गेवराईकडे परतणाऱ्या एका सोने व्यापाऱ्याला दैठण फाट्याजवळ अडवून त्याच्याकडील १४ तोळे ...

जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या - A
बीड : गेवराई तालुक्यातील मीरगांवचा बाजार करून गेवराईकडे परतणाऱ्या एका सोने व्यापाऱ्याला दैठण फाट्याजवळ अडवून त्याच्याकडील १४ तोळे सोने व ५ किलो चांदीचे दागिने असा ९ लाख ६६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल बळजबरी चोरून नेला होता. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. प्रकरणातील तिघांना ताब्यात घेण्यात यश आले असून, चार फरारींचा शोध सुरू आहे. दरम्यान, चोरीचे सोने विकत घेणाऱ्या गेवराईतील सोनारालाही अटक केली आहे.
गेवराई येथील सराफ चंद्रकांत उदावंत हे २७ फेब्रुवारी रोजी मीरगाव येथील आठवडी बाजाराला गेले होते. बाजार उरकून ते गेवराईकडे परतत असताना, दैठण फाट्याजवळ दुपारी १ वाजता आरोपी नितीन दत्तात्रय जाधव (रा.गेवराई), राहुल कुंडलिक बुधनर (रा.खामगाव), दीपक भुसारे (रा. शिर्डी) यांनी त्यांच्या इतर चौघांच्या साथीने चंद्रकांत उदावंत यांना थांबवून त्यांच्याकडील १४ तोळे सोने व जवळपास ५ किलो चांदीचे दागिने असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेतली आणि त्या ठिकाणावरून पळ काढला. या प्रकरणी उदावंत यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि भारत राऊत यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, गेवराईत छापा टाकून आरोपी नितीन जाधव, राहुल बुधनर आणि दीपक भुसारे यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच सोने व चांदी ही गेवराई येथील संदीप जवकर या सोन्याच्या व्यापाऱ्यास विकल्याचेही सांगितले. त्यानंतर, जवकर यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आर.राजा, उपाधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. भारत राऊत, सपोनि दुल्लत, पोह.तुळशीराम जगताप, विकास वाघमारे, बालाजी दराडे, मुन्ना वाघ, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, विक्की सुरवसे, चालक हतुल हराळे आणि जायभाये यांनी केली.
आणखी एका गुन्ह्याची दिली कबुली या प्रकरणात अटक केलेला आरोपी नितीन जाधव आणि राहुल बुधनर यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मार्फत ऑगस्ट, २०२० मध्ये गेवराईजवळील नागझरी फाटा येथील एका पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकाला धमकावून व मारहाण करून, त्याच्याकडील ३८ हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेतले होते. या गुन्ह्याचीही कबुली यावेळी आरोपींनी दिली. या चोरट्यांनी या अगोदरही अनेक गुन्हे केले असून, ते उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.